Join us

“हा शो स्क्रिप्टेड नाही”; पोलिसांच्या चौकशीत अपूर्वा मखिजाने सगळचं सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 19:25 IST

अपूर्वा मखिजाने दिलेल्या जबाबात इंडियाज गॉट लेटेंटबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

India's Got Latent Controversy: कॉमेडियन समय रैनाच्या स्टँड-अप कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटेंटवरुन सध्या जोरदार वाद सुरु आहे. या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने आई वडिलांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखिजा, समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी खार पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांकडे नोंदवण्यात आलेल्या जबाबात इंडियाज गॉट लेटेंटबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणात मुंबई पोलिसांनी बुधवारी सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर अपूर्वा मखिजा याच्यासह चार जणांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवले. अपूर्वा मखिजा देखील या रिॲलिटी शोचा एक भाग होती. अपूर्वा आणि आशिष चंचलानी यांनी या शोबद्दल बोलताना तो शोची स्क्रिप्टेट नसल्याचे म्हटलं आहे. तसेच या शोसाठी आम्हाला पैसेही मिळाले नसल्याचे दोघांनी सांगितले.

'द रिबेल किड' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अपूर्वा मखिजा आणि आशिष चंचलानी यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. यावेळी दोघांनीही पोलिसांत जबाब नोंदवला. “अपूर्व मुखिजा आणि आशिष चंचलानी यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलं की, हा शो स्क्रिप्टेड नाही. शोमध्ये, जज आणि सहभागींना मोकळेपणाने बोलण्यास सांगितले जाते आणि त्यासाठी पैसे दिले जात नाही,” असं पोलिसांनी म्हटलं.

“इंडियाज गॉट लेटेंट या शोच्या जजना मानधन दिले जात नाही. जजना त्यांच्या सोशल मीडियावर शोमधील कंटेट पोस्ट करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. याशिवाय शोमध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी तिकीट खरेदी करावे लागते. तिकीट विक्रीतून येणारा पैसा शोच्या विजेत्याला दिला जातो,” अशीही माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

समय रैनाची मागणी पोलिसांनी फेटाळली

समय रैनाच्या वकिलांनी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र मुंबई पोलिसांनी यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. समय रैना सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून तो १७ मार्चला मुंबईत परतणार आहे. त्यामुळे तपास सुरू झाल्यापासून १४ दिवसांच्या आत समयला पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे. 

टॅग्स :मुंबई पोलीस