Join us
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिकेला पसंती; दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड!

By रेश्मा शिवडेकर | Updated: April 24, 2024 17:55 IST

ऑक्सफर्ड इंटरनॅशनल्स स्टुडंट ग्लोबल मोबिलिटी इंडेक्सच्या अहवालात ही निरीक्षणे नोंदण्यात आली आहेत.

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या ६९ टक्के भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेला पसंती दिली आहे. त्या खालोखाल इंग्लंडला ५४ टक्के विद्यार्थ्यांनी झुकते माप दिले आहे. त्यानंतर कॅनडा (४३ टक्के) आणि ऑस्ट्रेलियाला (२७ टक्के) विद्यार्थ्यांची पसंती लाभली आहे.

ऑक्सफर्ड इंटरनॅशनल्स स्टुडंट ग्लोबल मोबिलिटी इंडेक्सच्या अहवालात ही निरीक्षणे नोंदण्यात आली आहेत. भारतातून परदेशात उच्चशिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पाहणी यात करण्यात आली होती. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांतील नामांकित विद्यापीठांमध्ये शिकण्याची आस विद्यार्थ्यांना आहे.

पाहणीत सहभागी झालेल्या ४५ टक्के विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे तिथे शिकण्याची इच्छा वर्तवली. तर ४५ टक्के विद्यार्थ्यांना तेथील शिक्षणसंस्थांच्या रेप्युटेशनमुळे तिथे शिकायचे आहे. तर इंग्लंडमधील शिक्षणाचा दर्जा ५९ टक्के विद्यार्थ्यांना महत्त्वाचा वाटतो. आणि ६१ टक्के विद्यार्थ्यांना तेथील संस्थांचे रेप्युटेशन. कॅनडात शिक्षणाबरोबरच काम करण्याकरिता मिळणारी संधी विद्यार्थ्यांना तेथे शिकण्यास प्रेरित करत असल्याचे दिसून आले. यात पाकिस्तान, व्हीएतनाम आणि नायजेरिया या देशांतील विद्यार्थ्यांचीही मते जाणून घेण्यात आली.

पाहणीतील इतर निरीक्षणे

  • शुल्क कमी असल्याने इंग्लंडला पसंती
  • शिष्यवृत्तींमुळे ऑस्ट्रेलियाला झुकते माप
  • भारत आणि नायजेरियातील विद्यार्थी पाकिस्तान आणि व्हीएतनामच्या तुलनेत परदेशी शिक्षणाबाबत एजंट्सची अधिक मदत घेतात.
  • भारतात परदेशी शिक्षणाबाबत पालकांची भूमिका आणि मार्गदर्शन मोठी भूमिका बजावते.
टॅग्स :मुंबई