Join us  

लोकलचे दरवाजे बंद करणाऱ्यांनो सावधान! रेल्वेकडून आतापर्यंत 100 प्रवाशांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 8:35 PM

ब-याचदा कार्यालयीन वेळेत लोकल पकडताना धावपळ होते. त्यातच काही प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची घाई असते.

मुंबई- ब-याचदा कार्यालयीन वेळेत लोकल पकडताना धावपळ होते. त्यातच काही प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची घाई असते. परंतु दरवाज्यावर उभे असलेले प्रवासी ब-याचदा लोकलचे दरवाजे बंद करतात. त्यामुळे प्रवाशांना वेळेत कामावर पोहोचण्यास उशीर होतो. अशा प्रवाशांना रेल्वे प्रशासन हिसका दाखवणार आहे. भारतीय रेल्वे प्रशासनानं लोकलचे दरवाजे बंद करणा-या अशा प्रवाशांना गंभीर इशारा दिला आहे. तुम्ही जर लोकलचा दरवाजा बंद केलात आणि तुम्हाला आरपीएफच्या जवानांनी पकडल्यास तुमच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो.पश्चिम रेल्वे प्रशासनानं अशा प्रकारे लोकलचे दरवाजे बंद करणा-यांवर कारवाई केली आहे. पश्चिम रेल्वेनं गेल्या पाच दिवसांत विरार-बोरिवली मार्गावर लोकलचे दरवाजे बंद करणा-या 94हून अधिक प्रवाशांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात आरपीएफच्या जवानांनी लोकलचे दरवाजे बंद करणा-या जवळपास 85 प्रवाशांना रंगेहाथ पकडले आहे. तसेच फूटबोर्डावरून प्रवास करणं हासुद्धा एक प्रकारचा गुन्हाच आहे. पश्चिम रेल्वेकडे अशा प्रकारच्या ब-याच तक्रारी आल्या असून, त्या विरार-बोरिवली मार्गावरील आहेत.आरपीएफचे जवान गोरख नाथ माल म्हणाले, विरार स्टेशनवर मी अशा ब-याच प्रवाशांना पाहिलं आहे की, जे दरवाज्यावर उभे राहून प्रवास करतात. त्यांना खटकले तरीही ते दरवाजावरच उभे होते. विशेष म्हणजे दरवाज्यावर उभे राहणा-या काही प्रवाशांचं गंतव्य स्थानकही फार दूर होतं. वसई आणि भाईंदरमधील प्रवाशांना लोकलमध्ये चढता येऊ नये म्हणून ते दरवाजाजवळ उभे राहतात. जेणेकरून ते लोकलमध्ये चढू शकणार नाहीत. पश्चिम रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त ए. के. सिंग म्हणाले, दरवाज्यावर उभे राहून अडवणूक करणा-या आणि दरवाजा बंद करणा-या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी आम्ही एक विशेष टीम तयार केली आहे. दरवाजा बंद करणा-या टवाळखोर मुलांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच असं काही कृत्य करताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेनंही डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्टेशनमध्ये अशा 29 प्रवाशांवर कारवाई केली आहे. 

टॅग्स :लोकलरेल्वे प्रवासी