Join us  

मुंबईत पहिली रेल्वे धावली; आज १७१ वर्षे पूर्ण झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 11:10 AM

मुंबईकरांना वाऱ्याच्या वेगाने प्रवासासाठी मदत करणाऱ्या रेल्वेने १७१ वर्षे पूर्ण केली आहेत.

मुंबई :मुंबईकरांना वाऱ्याच्या वेगाने प्रवासासाठी मदत करणाऱ्या रेल्वेने १७१ वर्षे पूर्ण केली आहेत. एवढ्या वर्षांत रेल्वेने प्रवाशांना चांगली सेवा देतानाच १५ डब्यांपर्यंत मजल मारली असून, आता तर एसीसारखा गारेगार प्रवासही सुरू केला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास थंडगार होत असून, प्रवास वेगवान करण्यासाठी रेल्वे अत्याधुनिक  प्रणालीची मदतही घेत आहे.

भारतीय रेल्वेने १७१ वर्षे पूर्ण केली असून, १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणेदरम्यान धावणारी आशियातील आणि भारतातील पहिली ट्रेन बोरी बंदर येथून रवाना झाली. पहिली ट्रेन चालवणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे १९०० मध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीत विलीन झाली. तिच्या सीमा उत्तरेला दिल्ली, उत्तर-पूर्वेकडे कानपूर व अलाहाबाद तसेच पूर्वेकडे नागपूर ते दक्षिण-पूर्वेकडील रायचूरपर्यंत विस्तारल्या. ५ नोव्हेंबर १९५१ रोजी निजाम संस्थान, सिंधिया संस्थान आणि ढोलपूर संस्थानातील रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना केली. सध्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे या ५ विभागांसह मध्य रेल्वे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४ हजार २७५ मार्ग किमीपेक्षा जास्त अंतरावर पसरली. राज्यातील ४६६ स्थानकांद्वारे मध्य रेल्वे सेवा देते आहे. नेरळ-माथेरान लहान रेल्वेनेही ११७ वर्षे पूर्ण केली आहेत. नेरळ-माथेरान रेल्वेचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू झाले. 

दोन फूट गेज लाइन अखेरीस १९०७ मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. पावसाळ्यात ही लाइन बंद राहिली, तथापि अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पावसाळ्यातही चालवण्यासाठी २०१२ पासून सुरू करण्यात आली.

१) एप्रिल १८५३ मधील पहिल्या ट्रेनपासून ते भारतातील सर्वात आधुनिक ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसपर्यंत रेल्वेने गेल्या १७१ वर्षांमध्ये जाळे विस्तृत केले आहे.

२) सध्या मध्य रेल्वे ६ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या चालवते.

३) पहिली शताब्दी एक्स्प्रेस, पहिली जनशताब्दी एक्स्प्रेस, पहिली तेजस एक्स्प्रेस व पंजाब मेलसारख्या काही जुन्या गाड्या १०० वर्षांनंतरही धावत आहेत.

४) ३ फेब्रुवारी १९२५ रोजी बॉम्बे व्हीटी आणि कुर्ला हार्बर दरम्यान भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन सेवा सुरू झाली.

५) आज मध्य रेल्वेने १०० टक्के विद्युतीकरणाचे लक्ष्य गाठले आहे.

टॅग्स :मुंबईभारतीय रेल्वेमध्य रेल्वे