Join us

भारतीय बनावटीची लोकल चाचणीस सज्ज

By admin | Updated: May 24, 2016 03:22 IST

भारतीय बनावटीची पहिलीवहिली ‘मेधा’ लोकल पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर चाचणीसाठी सज्ज झाली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या लोकलच्या चाचणीला परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई : भारतीय बनावटीची पहिलीवहिली ‘मेधा’ लोकल पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर चाचणीसाठी सज्ज झाली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या लोकलच्या चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. मे अखेर चाचणीला सुरुवात होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.मुंबई उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या सिमेन्स आणि बम्बार्डियर लोकलच्या निर्मितीचे काम हे रेल्वेच्या चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) केले जाते. निर्मिती जरी रेल्वेच्या फॅक्टरीत केली जात असली तरी लोकलमधील तंत्रज्ञान हे बम्बार्डियर आणि सिमेन्स याच कंपनीचे असते. मात्र ‘मेधा’ लोकलमधील तंत्रज्ञान हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे. हैदराबाद येथील ‘मेधा सर्व्हर ड्राइव्ह’ने मेधा हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या लोकलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यात प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून, आपत्तीत प्रवाशांना मोटरमनशी संपर्क साधता येईल, अशी यंत्रणा आहे. आसनक्षमता १ हजार १६८ असून, एकूण प्रवासी क्षमता ४ हजार ८६२ आहे. वेगमर्यादा ११0 किमी प्रतितास एवढी आहे. मेधा लोकल गाडीला चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. ही लोकल चाचणीसाठी सज्ज झाली असून, पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर चाचणी होईल. - सुशील चंद्र (सुरक्षा आयुक्त,परे )रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशनकडून लोकलची चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी मेच्या अखेरपासून घेण्यात येईल. - रवींद्र भाकर (पश्चिम रेल्वे - मुख्य जनसंपर्क अधिकारी)