Join us  

सायन रुग्णालयात कोरोनाच्या भारतीय लसीची लवकरच होणार मानवी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 5:51 AM

Corona Vaccine News: सायन रुग्णालयात सुरू होणाऱ्या चाचणीतील  ‘भारत बायोटेक’ ही लस पूर्णतः भारतीय बनावटीची आहे. या भारतीय लसीची चाचणी आता सायन रुग्णालयात होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत ऑक्सफर्डच्या कोरोना लसीनंतर दुसऱ्या एका कोरोना लसीची मानवी चाचणी करण्यात येणार आहे. ही लस भारतीय असून हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीची आहे. या लसीच्या मानवी चाचणीसाठी मुंबईतील सायन रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे.

सायन रुग्णालयात सुरू होणाऱ्या चाचणीतील  ‘भारत बायोटेक’ ही लस पूर्णतः भारतीय बनावटीची आहे. या भारतीय लसीची चाचणी आता सायन रुग्णालयात होईल. मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयाला हा मान मिळाला असून ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. दिवाळीनंतर या चाचणीला सुरुवात होणार असून हजार स्वयंसेवकांना लस देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यात परिचारिका, डॉक्टर आणि सर्वसामान्य अशा सर्वांचा समावेश असेल. ज्यांना कोरोना झाला नसेल, ज्यांच्यात कोरोनाच्या अँटिबॉडीज तयार झाल्या नसतील, ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकारासारखे आजार नसतील अशांचाच समावेश यात करण्यात येईल,  असे काकाणी यांनी सांगितले.‘केईएम’, ‘नायर’ मधील स्वयंसेवकांची प्रकृती उत्तमऑक्सफर्ड आणि सिरमच्या कोविशिल्ड मानवी चाचणीच्या प्रक्रियेनेही आता वेग घेतला आहे. केईएममध्ये १०० तर नायरमध्ये १४८ जणांना लस देण्यात आली. सप्टेंबरमध्ये या दोन्ही रुग्णालयांत चाचणीला सुरुवात झाली. आता या २४८ स्वयंसेवकांना दुसरा बूस्टर डोस देण्यात आला असून ते तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहेत, असे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. आतापर्यंत केईएम आणि नायरमधील सर्व स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :सायन हॉस्पिटलकोरोना वायरस बातम्या