अलिबाग : गौतम बुध्दांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. भारत देशाची संस्कृती महान असून भारतच जगात शांतता आणू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.अलिबाग येथील आरसीएफ - कुरुळ येथील बौध्द विहारातील भंते निवासाचे उद्घाटन अहिर यांच्या हस्ते झाले. पाकिस्तानात हल्लीच घडलेली अमानुषता हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार असून याला रोख बसणे आवश्यक आहे. मात्र शांतता प्रस्थापित करण्याची ताकद केवळ भारतातच असल्याचे त्यांनी सांगितले. अलिबाग-कुरुळ येथील आरसीएफचा प्रकल्प हा देशामध्ये सर्वाधिक नफा प्राप्त करुन देणारा प्रकल्प आहे. येथील व्यवस्थापनासह कामगारांनी मेहनत घेतल्यानेच हे शक्य झाले असून त्याचे कार्य असेच सुरु ठेवल्यास हा प्रकल्प देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास अहिर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर.जी. राजन, कार्यकारी संचालक आर.के. जैन, संयुक्त सचिव प्रसाद, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार मधुकर ठाकूर, चित्रलेखा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.हंसराज अहिर यांनी आरसीएफच्या थळ येथील प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी कामगारांशी संवाद साधल्याची माहिती जनसंपर्क विभागातील धुपकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
भारतच जगात शांतता प्रस्थापित करू शकतो!
By admin | Updated: February 15, 2015 22:49 IST