Join us  

जगातील कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी एकतृतीयांश भारतात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 1:21 PM

नवीन रुग्ण निदानाच्या प्रमाणात ६८ टक्क्यांनी वाढ

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेनुसार अंदाजे ७० टक्के कर्करोग हे निम्न आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांतील असल्यामुळे जागतिक स्तरावर कर्करोग हे मृत्यूचे दुसरे कारण आहे. देशात आढळून येणाऱ्या कर्करोगात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे, जाे पुरुषांमध्ये होणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे. २०२० मध्ये जागतिक स्तरावर एकूण निदान झालेल्या कर्करोगाच्या रुग्णांपैकी एकतृतीयांश रुग्ण भारतातले होते.

टाटा स्मारक केंद्राचे संचालक डॉ. आर. ए. बडवे म्हणाले, ‘ग्लोबोकॉनच्या आकडेवारीनुसार, केवळ गेल्या दोन दशकांमध्येच नवीन रुग्णांचे निदान होण्याचे प्रमाण ६८ टक्क्यांनी वाढले आहे. आरोग्याच्या काळजीबद्दलची साक्षरता कमी आहे, परिणामस्वरूप बहुतेक प्रकरणांमध्ये आजारपण प्रगत अवस्थेत आढळते, ज्याचा उपचार करणे कठीण असते.’

अंदाजे १० टक्के रुग्णांमध्ये आजार अंतिम टप्प्यात पाेहाेचल्याने ताे बरा हाेणे कठीण हाेते. ज्यांना उपचार दिले जातात ते बहुतेक बेरोजगार असतात. मित्र,  कुटुंबावर आर्थिक ओझे हाेतात. या समस्या सोडविण्यासाठी टाटा स्मारक केंद्र येथील डॉ. पंकज चतुर्वेदी आणि त्यांची टीम, आजाराचे खर्च विश्लेषण, उपाय यावर काम करत आहे. देशासह जगातील काही लोकांचा हाेणारा हा पहिला अभ्यास आहे. उशिराने होणाऱ्या निदानापैकी २०% निदान सुरुवातीला झाल्यास वर्षाकाठी २५० कोटी रुपयांची बचत होऊ शकते.

प्रगत टप्प्यांमध्ये उपचाराच्या सरासरी खर्चात हाेते वाढ

टाटा स्मारक रुग्णालयाचे रीसर्च फेलो आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. अर्जुन सिंह म्हणाले, प्रगत टप्प्यात उपचार करण्याच्या युनिटची किंमत २,०२,८९२ रुपये असते. ती सुरुवातीच्या टप्प्यापेक्षा (१,१,१३५ रुपये) ४२ टक्के जास्त असल्याचे दिसून आले आहे. एकूण खर्चापैकी ९७.८ टक्के खर्च वैद्यकीय उपकरणांवर होतो. प्रगत अवस्थेत शस्त्रक्रियेसाठीच्या वस्तूंच्या किमती, सुरुवातीच्या टप्प्यांपेक्षा १.४ पट जास्त असतात. शस्त्रक्रियेमध्ये अतिरिक्त केमो, रेडिओथेरपीसह, उपचारांच्या सरासरी किमतीतही ४४.६ टक्के वाढ झाली आहे.

टॅग्स :कर्करोग