Join us

११४ हेक्टर जागेसाठी स्वतंत्र विकास आराखडा, उपनगरातील एमएमआरडीएच्या जागा पालिकेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:05 IST

मुंबई : कुर्ला, अंधेरी पश्चिम आणि वांद्रे पश्चिम या ठिकाणच्या तब्बल ११४ हेक्टर परिसरासाठी मुंबई महापालिकेने स्वतंत्र विकास आराखडा तयार केला आहे.

मुंबई : कुर्ला, अंधेरी पश्चिम आणि वांद्रे पश्चिम या ठिकाणच्या तब्बल ११४ हेक्टर परिसरासाठी मुंबई महापालिकेने स्वतंत्र विकास आराखडा तयार केला आहे. त्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. २०१४-३४ या दोन दशकांचा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हा परिसर ताब्यात मिळाल्यानेस्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे.मुंबईचे पुढील २० वर्षांचे भवितव्य ठरविणारा विकास आराखडा जुलै महिन्याच्या अखेरीस मंजूर झाला. त्याची प्रक्रिया २०११पासून सुरू होती. मात्र त्या आराखड्यातील आरे कॉलनीचे ना विकास क्षेत्र बांधकामांसाठी खुले करणे अशा काही शिफारशी वादग्रस्त ठरल्या. त्यामुळे सुधारित विकास आराखडा तयार करण्याची वेळ महापालिकेवर आली. नागरिकांकडून हरकती व सूचना, त्यावर नियोजनसमितीपुढे सुनावणीनंतर हाआराखडा पालिकेच्या महासभेत मंजूर करून राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला आहे. मात्र ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएने आता एच/पश्चिम भागातील वांद्रे रेक्लेमेशन, एल विभागातील मिठी नदी आणि लाल बहादूर शास्त्री मार्गामधील परिसर, के/ पश्चिममधील एस. व्ही. रोड आणि लिंकिंग रोडमधील परिसराचा विकास आराखडा बनविण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला केल्या होत्या. या जागा आतापर्यंत एमएमआरडीएच्या अखत्यारीत असल्याने पालिकेला त्या भागांचा विकास करता येत नव्हता. पण आता एमएमआरडीएकडून हा परिसर पालिकेच्या ताब्यात मिळाल्याने या ११४ हेक्टर जागेसाठी नव्याने विकास आराखडा बनवण्यात येणार आहे.>आराखड्याच्या मसुद्यावर सुनावणी११४ हेक्टर विकासाचा स्वतंत्र नियोजन आराखडा तयार करून सर्वपक्षीय गटनेत्यांना सादर करण्यात आला आहे. मूळ नियोजन आराखड्याप्रमाणेच या नवीन आराखड्याचा मसुदा जाहीर करून त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. ३० डिसेंबरपर्यंत मुदत असून, या सूचना आल्यावर नियोजन समितीपुढे सुनावणी होऊन हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी पालिकेच्या महासभेपुढे व त्यानंतर राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.>‘या’ जागा पालिकेच्या ताब्यातमुंबईचा विकास आणि नियोजनाची जबाबदारी महापालिकेकडे आहे. मात्र स्वतंत्र प्राधिकरण असलेल्या एमएमआरडीएने कफ परेड, बॅकबे, वांद्रे-कुर्ला संकुल, ओशिवरा, वांद्रे पश्चिम या भागांचे नियोजन आपल्याकडे ठेवले. त्यामुळे या भागातील विकासकामे महापालिकेला करता येत नव्हती.यापैकी अंधेरी पश्चिमचे ३९.३ हेक्टर, वांद्रे-कुर्ला संकुलची ४७.३७. हेक्टर (यामध्ये वांद्रे रेक्लमेशन, लीलावती रुग्णालय आणि ओएनजीसी कॉलनीचा समावेश) तसेच लाल बहादूर शास्त्री मार्ग व कुर्ला येथील मिठी नदीच्या आसपासचा २७.३७ हेक्टर परिसर पालिकेच्या ताब्यात आला आहे.>पालिकेसमोर आव्हानरेल्वे, उड्डाणपूल, स्कायवॉकपाठोपाठ एमएमआरडीएने त्यांच्या हद्दीतील जागांची जबाबदारी झटकून पालिकेकडे दिली आहे. मात्र या जागांवर मोठ्या प्रमाणात झोपड्या आणि अतिक्रमण असल्याने त्यांच्या विकासाचे मोठे आव्हान पालिकेपुढे आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई