Join us

महापौरपदी अपक्ष नगरसेवक

By admin | Updated: May 6, 2015 00:54 IST

नवी मुंबईचा आगामी महापौर कोण, या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले असून रबाले येथील अपक्ष नगरसेवक सुधाकर सोनावणे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडून अर्ज भरला.

सुधाकर सोनावणे होणार महापौर : काँगे्रसचे अविनाश लाड यांना उपमहापौरपदनवी मुंबई : नवी मुंबईचा आगामी महापौर कोण, या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले असून रबाले येथील अपक्ष नगरसेवक सुधाकर सोनावणे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडून अर्ज भरला. त्यांच्यासमोर शिवसेनेने ऐरोली येथील नगरसेवक संजू वाडे यांना उभे केले आहे. तर उपमहापौरपदासाठी आघाडीकडून काँगे्रसचे नगरसेवक अविनाश लाड यांनी तर युतीकडून दिघा येथील भाजपा नगरसेविका उज्ज्वला झंझाड यांनी अर्ज भरले. येत्या ९ मे रोजी महापौर - उपमहापौरपदाची रीतसर निवडणूक होणार आहे. १११ सदस्य असलेल्या नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे ५२ आणि काँगे्रसच्या १० सदस्यांची आघाडी झाल्याने सोनावणे आणि लाड यांची निवड निश्चित आहे. तसेच पाच अपक्षांनीही पाठिंबा दिला असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला असला तरी ते कोणाच्या पारड्यात मत टाकतात, ते ९ मे रोजीच स्पष्ट होणार आहे. युतीकडे शिवसेनेचे ३८ आणि भाजपाचे सहा असे ४४ संख्याबळ आहे. मात्र तरीही घोडेबाजार वा नगरसेवकांची पळवापळवी टाळण्यासाठी युती व आघाडी दक्षता घेत आहे.सोनावणे हे राष्ट्रवादीपुरस्कृत अपक्ष नगरसेवक आहेत. तिसऱ्यांदा ते महापालिकेवर निवडून आले आहेत. गेल्या खेपेला आरक्षणात त्यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने पत्नी रंजना सोनावणे आणि मुलगी गौतमी यांना त्यांनी निवडून आणले होते. यावेळी ते स्वत: आणि पत्नी रंजना निवडून आले आहेत. रिपाइंने तिकीट देऊनही ते नाकारून त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यामुळे अपक्षास कसे काय मत देणार, असा काँगे्रस-राष्ट्रवादीमधील एका गटाचा आक्षेप होता. (खास प्रतिनिधी)नाईकांनी दिला होता शब्दमहापौरपद दलित संवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी लगेचच सोनावणेंना ते देण्यात येईल, असा शब्द दिला होता. तो त्यांनी स्वपक्षासह काँग्रेसच्या नाराज गटाचेही मतपरिवर्तन करून पाळला. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ होती. नगरसचिव चित्रा बावीस्कर यांच्याकडे युती आणि आघाडीच्या उमेदवारांनी आपले अर्ज सुपुर्द केले. याप्रसंगी राष्ट्रवादीकडून विद्यमान महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे, आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह पक्षाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सोनावणे आणि लाड यांच्यासोबत उपस्थित होते. तर युतीकडून खासदार राजन विचारे, भाजपा आमदार मंदा म्हात्रे, उपनेते विजय नाहटा, विजय चौगुले हे वाडे आणि झंझाड यांच्यासोबत होते.