Join us

अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी, पण ऐच्छिक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:06 IST

सीईटी देणाऱ्यांना प्राधान्य; प्रवेशप्रक्रियेनंतरच्या रिक्त जागांवर सीईटी न दिलेल्यांना संधीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावीच्या मूल्यांकनाचा तिढा सुटल्यानंतर ...

सीईटी देणाऱ्यांना प्राधान्य; प्रवेशप्रक्रियेनंतरच्या रिक्त जागांवर सीईटी न दिलेल्यांना संधी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावीच्या मूल्यांकनाचा तिढा सुटल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात एकच सीईटी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान ही सीईटी पूर्णपणे ऐच्छिक असून, दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून १०० गुणांची ही सीईटी दोन तासांच्या कालावधीत घेतली जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. इयत्ता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अकरावीची प्रवेशपरीक्षा राबविताना सामाईक प्रवेशपरीक्षा (सीईटी) दिलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येईल. त्यांचे प्रवेश झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त राहिलेल्या जागांवर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.

दरम्यान, सीईटी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि ती सर्व मंडळांसाठी असेल असे स्पष्ट करण्यात आले असले तरी सीबीएसई, आयसीएसई, राज्य मंडळाचा अभ्यासक्रम वेगवेगळा असल्याने सीईटी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये समतोल कसा साधला जाणार? असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला.

................................................................