Join us  

खरंच चित्रं खूप बोलकी असतात, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर पुन्हा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 9:16 PM

चित्रा वाघ यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या सहजतेचं, साधेपणाचं कौतुकही केलंय.

ठळक मुद्दे'एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची जाहिर मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास घेत सावरण्यासाठीचं बळ आणि सोबत असल्याचा विश्वास… खरच चित्रं खुप बोलकी असतात..!!!', असे ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. 

मुंबई - भाजप नेते आणि दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते अनुक्रमे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. आज त्यांनी पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील गावऱ्यांची भेट घेतली. 23 जुलै रोजी आंबेघरमध्ये दरड कोसळून 15 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गावातील नागरिकांची शाळेत निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यावेळी फडणवीस आणि दरेकरांनी गावकऱ्यांसोबत जेवणही केलं. या जेवणाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहे. यावरुन, भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे. 

चित्रा वाघ यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या सहजतेचं, साधेपणाचं कौतुकही केलंय. ''एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची जाहिर मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास घेत सावरण्यासाठीचं बळ आणि सोबत असल्याचा विश्वास… खरच चित्रं खुप बोलकी असतात..!!!', असे ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. 

मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. चिपळूणसारख्या ठिकाणी आलेल्या पुरामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झाल, तर अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, साताऱ्यातील आंबेघरमध्येही दरड कोसळून 15 जणांचा मृत्यू झालाय. 

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आज या परिसराच्या पाहणीसाठी आले होते. यावेळी त्यांनी मोरगिरी गावातील शाळेत असणाऱ्या दरडग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आंबेघरमध्ये झालेल्या दरड दुर्घटनेनंतर तिथल्या लोकांची या शाळेत सोय करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपच्या या दोन्ही नेत्यांनी यावेळी या दरडग्रस्तांसोबत शाळेतच जेवणदेखील केलं. 

वाढीव मदत मिळणं गरजेचंदरडग्रस्तांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'नुकसान खूप मोठं आहे. या सर्व दरडग्रस्तांच पुनर्वसन होणं गरजेचं आहे. शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालंय. अशा घटनांच्या वेळी मिळणारी मदत तोकडीच असते. पण त्यांना वाढीव मदत मिळणं अपेक्षित आहे. तात्पुरती नाही तर शक्य ती मदत परमनंट करावी लागेल',असे मत त्यांनी यावेळी व्यक्तं केलं. 

टॅग्स :चित्रा वाघदेवेंद्र फडणवीसपूरसातारा पूर