Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात दाखल होण्यास उशीर होत असल्याने वाढतेय मृत्यूचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:09 IST

टास्क फाेर्समधील तज्ज्ञांचे मत; फुप्फुसावर हाेताे कोरोनाचा गंभीर परिणामलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत रुग्णालयात दाखल होण्यास उशीर ...

टास्क फाेर्समधील तज्ज्ञांचे मत; फुप्फुसावर हाेताे कोरोनाचा गंभीर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत रुग्णालयात दाखल होण्यास उशीर होत असल्याने काेराेनाबाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले. या कारणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १० टक्के असून, यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज टास्क फोर्समधील डॉक्टरांनी व्यक्त केली.

सायन रुग्णालयातील औषध विभागाचे प्रमुख डॉ. नितीन कर्णिक यांनी सांगितले, या रुग्णालयात दाखल होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे उशिराने दाखल झालेले असतात. त्यामुळे आजार गंभीर अवस्थेत पोहोचलेला असतो. तर मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, शहरातील मृत्यूचे प्रमाण कमी आहे तसेच एकूण मृत्यूंत ९० टक्के मृत्यू अतिजोखमीचे आजार असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे आहेत. मात्र, दुसरीकडे उशिराने दाखल होणाऱ्या कमी वयातील रुग्णांचा मृत्यू ही चिंतेची बाब आहे.

परिणामी, उशिराने दाखल होणाऱ्या रुग्णांच्या फुप्फुसावर कोरोनाचा गंभीर परिणाम होतो. शिवाय, कमी वयात रोगप्रतिकारकशक्तीही मजबूत नसते. आजाराविषयी जनजागृतीचा अभाव असल्याने हे रुग्ण आजार गंभीर झाल्यानंतर उपचार प्रक्रियेत येतात, तोपर्यंत आजारावर नियंत्रण मिळविणे हे डॉक्टरांसाठी आव्हान बनलेले असते. त्यामुळे कोणतीही लक्षणे जाणवल्यास तातडीने निदान, उपचार आणि गरजेनुसार रुग्णालयात दाखल झाल्यास काेराेनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, अशी माहिती मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.