Join us  

राँग नंबर... अहो, ही गाडी माझी नाही! चुकीच्या ई-चलनाच्या वर्षभरात लाखावर तक्रारी 

By मनीषा म्हात्रे | Published: February 28, 2024 9:57 AM

१७ हजार चलन केले रद्द.

मनीषा म्हात्रे, मुंबई : कुठलेही नियम न मोडता आलेल्या ई-चलनाच्या संदेशाने अनेकांचा गोंधळ उडतो. वाहन क्रमांकावरील चुकीच्या किंवा अर्धवट क्रमांकामुळे चुकीचे ई-चलन जारी केल्याच्या तक्रारी समोर येतात. गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांकडे १ लाख ४४ हजार ९२० ई-चलन संबंधित तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी खातरजमा करत १७ हजार ९१७ चलन रद्द करण्यात आले आहेत. 

वाहतूक पोलिसांनी गेल्या पाच वर्षांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध २ कोटी ८६ लाख ११ हजार ४८५ ई-चलन जारी केले. १ हजार २२३ कोटी ६ लाख ७८ हजार ५६२ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यापैकी आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४४ हजार ७७८ ई-चलनाची ५५३ कोटी ६३ लाख ९५ हजार ६६२ रुपयांची वसुली झाली आहे. यामध्ये गेल्या वर्षी १४८ कोटी ९९ हजार ६१ हजार ३०० रुपयांचा समावेश आहे. या तक्रारींसोबतच अनेकदा चुकीचे ई-चलन आल्याच्या तक्रारीचा सूरही वाढत आहे. वाहतूक पोलिसांच्या संकेतस्थळावर ई-चलन रद्द करण्याबाबतची सुविधा उपलब्ध आहे. गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांकडे १ लाख ४४ हजार ९२० तक्रारी आल्या. यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तक्रारीचे प्रमाण १५ ते १९ हजार होते.

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तक्रारीचे प्रमाण १५ ते १९ हजार होते. त्यानंतर एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान हे प्रमाण १० ते ८ हजारांवर आले. डिसेंबर महिन्यात पुन्हा १७ हजार ७३० तक्रारी आल्या. वर्षभरात एकूण १७ हजार ९१७ तक्रारीमध्ये तत्थ आढळून आले. मात्र अन्य तक्रारीत नियमांचे उल्लघन न केल्याबद्दल ठोस पुरावे मिळून आले नसल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या अँपवरून, संकेतस्थळावर जावून हे चलन रद्द करू शकता.

एक्सचा व्हाय झाला :

१) पेणमध्ये असलेल्या दुचाकी मालकाला मुंबईत नियम मोडल्याचा संदेश आला.

२) चौकशीत मुंबईतील वाहन चालकाच्या वाहनावरील एक्सचा व्हाय झाल्यामुळे चुकून तो ई-चलन जारी झाला. मात्र, तक्रारीनंतर ते चलन रद्द करण्यात आले.

चुकीचे ई-चलन गेल्याची तक्रार येताच त्या संबंधित योग्य ते पुरावे सबमिट केल्यास ते रद्द केले जाते. तसेच कोणी पैसे भरले असल्यास तेदेखील त्यांना परत मिळतात. एक्सवरील वाहतूक पोलिसांच्या हँडलवर तसेच वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात येणाऱ्या कॉलमध्ये माहिती देणाऱ्या कॉलचे प्रमाण अधिक आहे. दिवसाला दोनशेहून अधिक ट्विट केल्या जातात. त्यामध्ये माहिती देणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. माहिती, फोटो अचूक असल्यास कारवाई करण्यात येते. पत्ता पूर्ण असून फोटोंबाबत माहिती नसल्यास वाहतूक पोलिसांना त्या स्पॉटवर पाठवून खातरजमा करून कारवाई केली जाते. - एम. रामकुमार, अपर पोलिस आयुक्त, मुंबई वाहतूक पोलिस

मल्टी मीडिया सेलची कामगिरी :

वाहतूक पोलिसांच्या वरळीतील मुख्यालयात मल्टी मीडिया सेल अंतर्गत ई-चलन संबंधित कामकाज पाहिले जाते. सह. पोलिस आयुक्त अनिल कुंभारे, अपर पोलिस आयुक्त एम. रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सेलचे पोलिस निरीक्षक संदीप बडगुजर, पोलिस उपनिरीक्षक पूनम पवार, बालाजी पवार, पोलिस अंमलदार विजय नरवाडकर यांच्यासह ५० जणांची टीम कामकाज पाहते.

एक्सवर दोनशे जणांची टिवटिव :

वाहतूक पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलला दिवसाला वाहतूक संबंधित माहिती, तक्रारीचे २०० हून अधिक ट्विट येत आहेत. ट्विटवरील माहितीच्या आधारे मल्टी मीडिया सेलची टीम काम करते. अवघ्या अर्ध्या तासात कारवाई होत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईवाहतूक पोलीसआरटीओ ऑफीस