Join us  

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहतुकीच्या खर्चात झाली वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 6:04 AM

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे लोक आधीच संकटात आहेत. त्यात पेट्रोल , डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत; मात्र विविध प्रश्नांवर ...

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे लोक आधीच संकटात आहेत. त्यात पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत; मात्र विविध प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या संघटनांचे या मुद्याकडे दुर्लक्ष  होताना दिसत आहे.कोरोनामुळे सामान्य जनता आणि वाहतूकदार आर्थिक संकटात आहेत.या आर्थिक वर्षी प्रत्येकजण दडपणाखाली आहे. इंधन दरवाढ केल्यास त्याचा इतर वस्तूंच्या किमतीवर परिणाम होतो. त्याचा फटका सामान्य व्यक्तीला बसतो. वाहतूक व्यवसायात बसच्या  ३५ ते ४० टक्के खर्च  डिझेलचा असतो. जर डिझेलच्या दरात १० टक्के वाढ झाली तर बसच्या खर्चात आणखी १० टक्क्यांची भर पडते.  सर्व किमती ४ टक्क्यांनी वाढतात. डिझेल दरवाढीचा वाहतुकीवर प्रचंड परिणाम होतो. कोणत्याही वस्तूची लॉगीस्टिक कॉस्ट ही १५ टक्के आहे. त्यातील ५० टक्के किंमत ही वाहतुकीची असते. त्यामध्ये ३५ टक्के वाढणार आहे. त्याचा वस्तूंच्या किमतीवर परिणाम होतो, या वस्तूंचे भाव ३ ते ५ टक्क्यांनी वाढतील.प्रत्येक व्यक्तीचा हा खर्च वाढणार आहे. प्रत्येक खरेदीवर खर्च करावा लागेल. 

पेट्रोल, डिझेल दरवाढ परिणामपेट्रोल व डिझेलच्या दरात सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला असून प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ऑटोचालक, मालवाहू वाहनधारक आणि कृषीमालाची ने-आण करणारे वाहनचालक अडचणीत सापडले आहेत. मुंबईत विविध भागातून शेतीमाल आणि इतर आवश्यक वस्तू विक्रीसाठी येतात. मात्र डिझेलचे दर वाढल्याने वाहनमालकांकडून अधिकचे पैसे मागितले जात असल्याने शेतकरी, अन्य उत्पादक हैराण झाले आहेत.

काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढ झाल्यास भाजपकडून मंत्र्यांना बांगड्या पाठवण्यात येत होत्या. आता ते सत्तेत आहेत त्यांचे नेते गप्प बसले आहेत. एकीकडे वाहतूकदारांना करमाफी दाखवणार आणि दुसरीकडे इंधन दरवाढ करून वसूल करणार ही सरकारची कटुनीती आहे. इंधन दरवाढ केल्यामुळे महागाई वाढेल आणि त्यामध्ये सामान्य जनता भरडली जाईल. सरकार जनतेची लूट करत आहे.- संजय नाईक, अध्यक्ष मनसे वाहतूक सेना

सध्याची परिस्थिती बिकट आहे. वाहतूकदार अडचणीत आले आहेत.असे असताना पेट्रोल, डिझेल दरवाढ अन्यायकारक होईल. इंधनाची दरवाढ झाली तर वाहतूकदारांना, शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. सरकारने सबसिडी द्यायला हवी.हे दर कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. - अध्यक्ष, नवभारतीय शिव वाहतूक संघटना

भाजप विरोधात असताना आंदोलन केले जात होते. मात्र आता भाजप सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात इंधनदरवाढ झाली आहे. इंधन दरवाढ केल्यास त्याचा सर्व जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम होतो. याबाबत आंदोलने सुरू आहेत पण अनेक आंदोलने माध्यमे समोर आणत नाहीत.    - विश्वास उटगी, कामगार नेते

 

टॅग्स :पेट्रोलडिझेलपेट्रोल पंप