Join us
Daily Top 2Weekly Top 5

मौखिक कर्करोगात वाढ; गेल्या सहा वर्षांची आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:04 IST

इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चचे सर्वेक्षण

मुंबई : द इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकतीच देशातील कर्करोगाबद्दल सर्वेक्षण केले. त्यानुसार गेल्या सहा वर्षांत कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. भारतीय पुरुषांमध्ये ओठ आणि मौखिक पोकळीचा (तोंडातील पोकळी) कर्करोग जास्त प्रमाणावर आढळून येत असल्याचे अभ्यास सांगतो. फुप्फुसांचा कर्करोग या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्याच्या केसेसमध्ये ६.४५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबोकॉन २०१८’ या अहवालात ही निरीक्षणे मांडण्यात आली असून हा अहवाल १८५ देशांतील ३६ प्रकारच्या कर्करोगाच्या घटना व मृत्यूदरांवर आधारित आहे. अहवालानुसार, देशासंदर्भातील माहितीत ओठ आणि मौखिक पोकळीच्या कर्करोगात तब्बल ११४ टक्क्यांची तीव्र वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. देशात २०१२ मध्ये ५६ हजार केसेस नोंदवण्यात आल्या असून ही संख्या २०१८ पर्यंत ११,९९,९२३ पर्यंत पोहोचली आहे.

मौखिक कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणामागे तंबाखूचे विशेषत: धूम्रपानविरहित तंबाखू उदा. गुटखा, सुपारी इत्यादींचे सेवन ही महत्त्वाची कारणे आहेत. धूम्रपानविरहित तंबाखू मौखिक कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक असून तंबाखू व मद्यामुळे हा आजार होतो. नुकतेच प्रसिद्ध झालेले अहवाल असे सांगतात की, अलीकडे भारतातील तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होत असून लोकांमध्ये तंबाखूचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलची जागरूकता वाढत आहे व हे चांगले चिन्ह आहे, असे अपोलो आॅन्कोलॉजिस्ट डॉ. तेजिंदर सिंग यांनी सांगितले.

१४० देशांतील ३६ कोटी लोक धूम्रपानविरहित तंबाखूचे सेवन करतात आणि त्यामुळे जगभरात ६,५०,००० लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी देशात जवळपास २० कोटी लोक धूम्रपानविरहित तंबाखूचे सेवन करतात व त्यामुळे दरवर्षी ३ लाख ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. या अभ्यासात स्तनाच्या वाढत्या कर्करोगाचे प्रमाणही नमूद करण्यात आले असून ते २०१२ मधील १.४ लाखांवरून २०१८ मध्ये १.६ लाखांवर गेले आहे. याखेरीज, गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी झाले असून २०१२ मधील १.२३ लाखांवरून २०१८ मध्ये ९६ वर आले आहे.४०-६९ वयोगटातील मृत्यूंत कर्करोगाचे प्रमाण ११.५%देशातील राज्यांनुसार आजारांसंदर्भातला अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यात राज्यातील ४०-६९ वर्ष वयोगटातील मृत्यूंमध्ये कर्करोगाचे प्रमाण ११.५ टक्के असून या वयोगटातील मृत्यूमागचे ते दुसरे मोठे कारण आहे. राज्यातील ४०-६९ वर्ष वयोगटातील मृत्यूंमागे सर्वात महत्त्वाचे कारण हृदयविकाराचा झटका हे आहे.

टॅग्स :कर्करोग