मुंबई : अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईत साथीच्या आजारांना आमंत्रण दिले आहे. विशेषतः दक्षिण मुंबईत मलेरिया आणि डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गेले दीड वर्षे कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे.
जून महिन्यात मलेरियाचे ३५७ रुग्ण सापडले होते तर जुलै महिन्याच्या दहा दिवसातच २३० रुग्ण आढळले आहेत. वर्षभरात मलेरियाच्या दोन हजार रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी डेंग्यूचे २० रुग्ण सापडले आहेत. यापैकी बहुतांशी रुग्ण कुलाबा, कफ परेड, चर्चगेट, माजगाव, भायखळा, वरळी, लोअर परळ या विभागांमध्ये आढळले आहेत.
ताप, डोकेदुखी आणि खोकल्याची लक्षणे आढळून आल्यावर कोरोना झाल्याच्या भीतीने नागरिक हवालदिल होत आहेत. प्रत्यक्षात चाचणी केल्यानंतर कोरोना नव्हे तर मलेरिया, डेंग्यू झाला असल्याचे समोर येत आहे. दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने असे परिसर मलेरिया व डेंग्यू डासांच्या अळीसाठी उत्पत्तीस्थान बनत असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.