Join us

बेकायदा टंकलेखन केंद्रांत वाढ

By admin | Updated: February 13, 2015 22:27 IST

टंकलेखन आणि लघुलेखनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला ज्या जिल्ह्यात परवानगी आहे, त्याच परिसरात केंद्र चालविण्याची मुभा आहे,

वैभव गायकर, पनवेलटंकलेखन आणि लघुलेखनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला ज्या जिल्ह्यात परवानगी आहे, त्याच परिसरात केंद्र चालविण्याची मुभा आहे, मात्र रायगड जिल्हा शिक्षण विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे कामोठे, खारघर परिसरात ठाणे येथील बोगस संस्थेमार्फत टंकलेखन केंद्रे चालविली जात आहेत.शासकीय क्षेत्रात लघुलेखन आणि टंकलेखन उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थी अशाप्रकारच्या अभ्यासक्रमांना प्राधान्य देतात. रायगड जिल्हा शिक्षण विभागाकडून पनवेल तालुक्यात टंकलेखन आणि लघुलेखनाचे प्रशिक्षण देणाऱ्या पनवेल, कामोठे, खांदा कॉलनी आदी ठिकाणी सात संस्थांना मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, खारघर, कामोठ्यात शाळा, महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता ठाणे येथून टंकलेखन आणि लघुलेखनाची परवानगी घेतलेल्या संस्थेने खारघर, कामोठेमध्ये अनधिकृत केंद्रे सुरू केली आहेत. शासनाच्या नियमानुसार ज्या जिल्ह्यात परवानगी दिली जाते, त्याच कार्यक्षेत्रात केंद्र सुरू करणे आवश्यक असताना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे परिसरात दोन ते तीन वर्षांपासून काही केंद्रे सुरू केल्याचे समजते. मुंबई विभागाचे उपसंचालक भी. दि. फडतरे यांनी खारघरमधील स्कॉलर या संस्थेची मान्यता रद्द केल्याचे पत्र पाठविले. याबाबत संजय पाटील म्हणाले की, खारघरमध्ये केंद्र सुरू करण्यासाठी रायगड जिल्हा शिक्षण विभागाकडे परवानगी मागितली असता विविध कारणे सांगून माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अखेर माहिती अधिकाराचा वापर करून घेतलेल्या माहितीनुसार, खारघरमध्ये एकाही संस्थेला मान्यता दिलेली नसताना कामोठे, खारघर परिसरात ठाणे येथील संस्थेने विविध नावाने केंद्र सुरू केले.रायगड जिल्हा शिक्षण विभागाचे उप शिक्षणाधिकारी पी. एस. कोकाटे म्हणाले की, एका जिल्ह्याची मान्यता असताना दुसऱ्या जिल्ह्यात केंद्र सुरू करता येत नाही. जे केंद्र सुरू आहेत त्यांना केंद्र बंद करण्याची नोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी)