पाली : राज्य शासनाच्या वतीने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी राज्यातील विभागीय क्रीडा संकुलाचा निधी २४ कोटी, जिल्हा स्तरावरचा क्रीडा संकुलाचा निधी चार कोटीवरून आठ कोटी तर तालुका क्रीडा संकुलाचा निधी २५ लाख रुपयांवरून एक कोटी केला आहे. पूर्वी पालक आपल्या मुलांना क्रीडा क्षेत्रात पाठविण्यासाठी तयार होत नव्हते परंतु आता राज्य शासनाच्या वतीने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटूंना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण दिले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.आज सुधागड तालुका क्रीडा संकुलाचा भूमीपूजन सोहळा संपन्न होत आहे. याचा आनंद आपणा सर्वांना होत आहे. या प्रकल्पाचा एक कोटी खर्चापैकी नव्वद लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच हे क्रीडा संकुल तयार होईल. या क्रीडा संकुलाचा लाभ तालुक्यातील सर्व मुले आणि मुलींना होणार आहे. क्रीडा क्षेत्रात आवड असणारे खेळाडू यात नैपुण्य दाखवून आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवतील आणि आपले व महाराष्ट्राचे नाव उज्वल करतील असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत सुधागड तालुका क्रीडा समितीद्वारा आयोजित तालुका क्रीडा संकुलाचे भूमीपूजन ना. अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी रायगडचे पालकमंत्री ना. सचिन अहिर, विधानसभा सदस्य आमदार सुनील तटकरे, आमदार धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल, पंचायत समितीच्या सभापती पुष्पा डुमना, पालीचे सरपंच राजेश मपारा, रा.डी.सी.सी. बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, जिल्हाधिकारी सुमंत भांगे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, रोहा उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनिता रिकामे, तहसीलदार व्ही. के. रौंदाळ आदी मान्यवर तसेच सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
क्रीडा संकुलाच्या निधीत वाढ
By admin | Updated: August 18, 2014 01:10 IST