Join us  

वरळी, महालक्ष्मी कोरोना काळजी केंद्रात खाटांची वाढ; अतिदक्षता विभागात सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 1:39 AM

३० मेपासून सुविधा सुरू होणार

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने मुंबईतील कोरोना काळजी केंद्रात खाटांची क्षमताही वाढविली आहे. यापैकी वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आॅफ इंडिया (एनएससीआय) येथील केंद्रात ४० खाटांची अतिदक्षता उपचार सुविधा (आयसीयू) उभारण्यात येत आहे. तर महालक्ष्मी रेसकोर्स येथील केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या शनिवारपासून या दोन्ही सुविधा कार्यान्वित होणार आहेत.

कोविड १९ अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एनएससीआय येथे बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, विशेष कार्य अधिकारी प्राजक्ता लवंगारे, सहआयुक्त (दक्षता) आशुतोष सलिल, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते.

यावेळी मुंबईत विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या जंबो फॅसिलिटी सुविधांबाबत आयुक्तांनी माहिती दिली. पालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, खासगी रुग्णालये व दवाखाने या सर्वांमध्ये करण्यात आलेल्या सेवासुविधा, तरतूद, रुग्णांना खाटा व रुग्णवाहिका जलदगतीने व समन्वयाने उपलब्ध करून देण्याबाबत सुरू असलेली कार्यवाही याची सविस्तर माहिती पालकमंत्री ठाकरे यांना देण्यात आली.

अशा आहेत सुविधा

च्जी/दक्षिण विभागामध्ये नॅशनल स्पोटर््स कॉम्प्लेक्स आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे ५०० खाटांचे कोरोना काळजी केंद्र यापूर्वीच सुरू झाले आहे. तर विस्तारित सुविधा म्हणून आणखी १५० अशा एकूण ६५० खाटांची क्षमता येथे वापरात आहे. त्यात वाढ करून ४० खाटांची अतिदक्षता उपचारांची सुविधा (आयसीयू बेड) जवळपास पूर्णत्वास आली आहे.

च्महालक्ष्मी रेसकोर्स येथे पहिल्या टप्प्यात ३०० खाटांची क्षमता असलेले कोरोना काळजी केंद्राचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. यामध्ये १०० खाटा या आयसीयू उपचारांसाठी आहेत. या केंद्राचा विस्तार म्हणून आणखी ५०० खाटा उपलब्ध करण्यात येणार आहेत.च्तसेच आणखी १२६ आयसीयू खाटांची सुविधा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही सुविधा येत्या १० ते १५ दिवसांच्या आत पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस