गजानन कीर्तिकर : मुंबई उपनगर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महामार्गावर वाहनचालकांसाठी विश्रामगृह, स्वच्छतागृह इ. मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्यामुळे कामाचा ताण येऊन मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे मत खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केले. ते रस्ता सुरक्षा समितीत्या बैठकीत बोलत होते.
केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयामार्फत दरवर्षी संपूर्ण देशात रस्ता सुरक्षा अभियानाबाबत एक मासिक कार्यक्रम आयोजित केला जातो. या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे येथे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली. यावर्षी हे अभियान येत्या १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये खासदार गजानन कीर्तिकर यांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने विविध मुद्दे मांडले. मुख्यत: अपघात हे अवजड व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होत असल्यामुळे अशा वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जादा माल वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे तसेच त्या वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देताना होत असलेला भ्रष्टाचार तसेच आरटीओ कार्यालयातील अपुरे मनुष्यबळ याबाबत लक्ष वेधले.
रस्ता सुरक्षेच्या कामामध्ये महामार्गावर दुभाजक, मार्गदर्शक फलक, रेडिअम रिफ्लेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, घाटांमध्ये रस्त्याचे रुंदीकरण व कठडे बांधणे आदी सुविधा निर्माण करण्याची आणखी गरज आहे, असे सांगितले. तसेच अपघात झाल्यानंतर मोटर ट्रिब्युनल न्यायालयात खटले चालविले जातात. गेली अनेक वर्षे हजारोंनी खटले प्रलंबित असल्यामुळे अपघातग्रस्तांना इन्शुरन्सचा दावा, नुकसानभरपाई पासून वंचित राहावे लागते. याकरिता लोकअदालत धर्तीवरती न्यायालयाची स्थापना करून खटले अग्रक्रमाने निकाली काढावे व ट्रीब्युनलची संख्या वाढवावी अशी आग्रही मागणी कीर्तिकर यांनी केली. याप्रसंगी खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासह मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.