Join us

जनआरोग्य योजनेत ५०० रुग्णालयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 04:52 IST

राज्यामध्ये मोहोल्ला क्लिनिकच्या धर्तीवर हेल्थ वेलनेस सेंटर सुरु करण्यात येतील. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य उपचार सुविधा देण्यात येईल.

मुंबई : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून राज्यात आता प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतील रुग्णालयांची संख्या दुप्पट करुन ती एक हजार इतकी करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली.

मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर या संदर्भात अधिक माहिती देताना आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना खर्चिक वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळत आहे. या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत मागणी केली जात होती. त्यानुसार रुग्णालयांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दोन आठवड्यात त्या संबंधीचा शासकीय आदेश काढला जाईल. विशेषत: दुर्गम, अतिदुर्गम भागातील तालुक्यांमध्ये रुग्णालयांचा समावेश करताना आवश्यकता भासल्यास काही प्रमाणात निकष शिथिल केले जातील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.हेल्थ वेलनेस सेंटर उभारणारराज्यामध्ये मोहोल्ला क्लिनिकच्या धर्तीवर हेल्थ वेलनेस सेंटर सुरु करण्यात येतील. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य उपचार सुविधा देण्यात येईल. डॉक्टर, वैद्यकीय उपकरणे, औषधे यांची उपलब्धता राहून सर्वसामान्यांना त्यांच्याच भागात उपचाराची सुविधा मिळेल असे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास त्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाईल. मोहोल्ला क्लिनिकचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्ली येथे भेट देतील.