Join us

एमटीएनएलच्या ग्राहकांची गैरसोय

By admin | Updated: May 20, 2014 02:16 IST

नवी मुंबई विभागातील महानगर टेलिफोन निगमचा सीएसएमएस सेक्शन गुरुवारपासून बंद पडून पूर्णत: ब्लॉक झाला.

नवी मुंबई : नवी मुंबई विभागातील महानगर टेलिफोन निगमचा सीएसएमएस सेक्शन गुरुवारपासून बंद पडून पूर्णत: ब्लॉक झाला. त्यामुळे नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील एमटीएनलची बरीच कामे खोळंबली. ग्राहकांना टेलिफोन बिल अदा करता आले नाहीच त्याचबरोबर नवीन कनेक्शनकरिता वर्कआॅर्डर देता आली नाही. नवी मुंबई महापालिका, पनवेल नगरपालिका हद्द त्याचबरोबर सिडको वसाहतीत महानगर टेलिफोन निगम दूरध्वनी सेवा पुरते, शासकीय निगम असल्याने त्याचबरोबर टेलिफोन बिल रहिवाशांना पुरावा म्हणून वापरता येत असल्याने शहरात एमटीएनएलचे अनेक ग्राहक झाले आहेत. प्रत्येक विभागात कमीत कमी ७ आणि जास्तीत जास्त दहा हजार ग्राहक आहेत असे असले तरी सध्या अनेक खाजगी कंपन्या स्पर्धेत उतरल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी संबंधीत कंपन्या अधिक चांगल्या सुविधा देत आहेत. त्याचबरोबर ग्राहकांना कोणत्या अडचणी येऊ नयेत त्यांना अखंडित आणि सुरळीत सेवा देण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ लागली आहे. या स्पर्धेत एमटीएनएल काही प्रमाणात मागे पडले आहे.प्रत्येक विभागात टेलिफोनची वाहिनी पोहचवण्यात आली आहे. मात्र अनेकदा खोदकाम आणि इतर कारणामुळे केबल तुटून सेवा ठप्प होते. गेल्या गुरुवारपासून नवी मुंबईतील म्हणजे वाशी मंडळातील सीएसएमएस विभागाची सेवा ठप्प झाली आहे. अंतर्गत व्यवस्थेत मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने गेली पाच दिवस ही सेवा सुरळीत करण्यास खर्ची पडले. या विभागात ग्राहकांची टेलिफोन बील स्वीकारण्याचे काम केले जाते ग्राहकांची संख्या जास्त असल्याने बिलांचा भरणाही मोठा असतो. त्यातच सेवा खंडित होईल या भीतीने नवी मुंबई आणि पनवेलकर बिल भरण्यास विलंब करीत नाहीत. परंतु ही सेवा ठप्प झाल्याने ग्राहकांचे बिल कुठेच स्वीकारता आले नाही. त्यामुळे अनेकांना पाच दिवस हेलपाटे मारावे लागले. एक दिवस बिल भरले नाही तर लागलीच सेवा बंद केली जाते आता आम्हाला इतक्या फेर्‍या माराव्या लागल्या, त्याला जबाबदार कोण असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)