मुंबई : रेल्वेकडे असलेल्या तक्रार नोंदवहीत आता मराठीच्या नोंदीचा समावेश करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून मराठीची नोंद असलेल्या ५00 नवीन वह्या मध्य रेल्वेच्या अखत्यारित येणाऱ्या राज्यातील सर्व स्थानकांवर पाठवण्यात आल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेन्द्र पाटील यांनी दिली. रेल्वे स्थानकात असणारे स्टेशन मास्तर, सहाय्यक व्यवस्थापक आणि लोकल, मेल-एक्सप्रेसचे गार्ड यांच्याकडील असलेल्या तक्रार नोंदवहीत फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर होत होता. या वहीत तक्रारदाराचे नाव, पत्ता, तक्रार, संपर्क क्रमांक आदी माहिती असते. ही माहिती मराठीतही नसल्याने त्याची दखल मध्य रेल्वेचे मुख्य कमर्शियल व्यवस्थापक आर.डी.शर्मा यांनी घेतली आणि मराठीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. मध्य रेल्वेवर तक्रार पुस्तिकेत महिन्याला ३00 तक्रारी आणि सूचना येतात. आॅनलाईन तक्रारीही जवळपास ५00 येत असल्याचे ते म्हणाले. रेल्वेकडे ९७१७६३0९८२ या क्रमांकावरही तक्रार करता येऊ शकते. (प्रतिनिधी)
रेल्वेच्या तक्रार नोंदवहीत मराठीचा समावेश
By admin | Updated: November 3, 2015 03:06 IST