Join us  

शरद पवारांच्या हस्ते आज लालबागचा राजा आरोग्योत्सवाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 5:42 AM

कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लालबागच्या राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने सोमवारपासून प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन केले जाणार आहे.

कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लालबागच्या राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत उपक्रमाला सुरू होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.मंडळाने के.ई.एम. रुग्णालयाच्या साथीने प्लाझ्मादान मोहीम हाती घेतली आहे. ३ आॅगस्ट ते ३१ आॅगस्टपर्यंत इच्छुकांना नोंदणी करता येईल. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात लढताना धारातीर्थी पडलेल्या २२ जवानांच्या कुटुंबीयांना दोन लाखांचे अर्थसाहाय्य आणि शौर्यचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. कोविडशी लढताना हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना एक लाख, शौर्यचिन्ह दिले जाणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. कोविड योद्ध्यांच्या सन्मानासोबतच गणेशोत्सव काळात २२ ते ३१ आॅगस्टदरम्यान रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आल्याचे मंडळाने सांगितले.

टॅग्स :शरद पवारलालबागचा राजा