ठाणे : ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी बनविलेल्या वस्तुंची खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी या कारागृहाच्या बाहेरच विक्री केंद्र सुरु केले आहे. या केंद्राचे उद्घाटन ठाण्याचे पोलिस आयुक्त विजय कांबळे, कारागृहाच्या अपर पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांच्या हस्ते मंगळवारी झाले.कारागृह उद्योग निर्मित वस्तु विक्री केंद्र उभारण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी विशेष निधी उपलब्ध करुन दिला होता. त्याच निधीतून कारागृहाबाहेर अॅटोमेटीक ट्रेलन मशिन (एटीएम) आणि फर्निचर तसेच विविध वस्तुंच्या विक्रीचे शोरुम बांधण्यात आले होते. याच नव्या शोरुमचे उद्घाटन पी. वेलरासू, कारागृहाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बिपीनकुमार सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कारागृह अधीक्षक यू. टी. पवार यांच्यासह कर्मचारी यावेळी उपस्थित होते.कारागृहातील कैद्यांच्या पुनर्वसनासाठी पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे अशा प्रकारचे शोरुम यापूर्वीच सुरु करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर ठाण्यातही हे शोरुम सुरु करण्यात आले आहे. आता याठिकाणी दिवाळी मेळाही भरविण्यात आला असून याठिकाणी लहान मुलांच्या खेळण्यांपासून ते उंची फर्निचर, कपडे,बेडशीट अशा सर्व कैद्यांनी बनविलेल्या वस्तु विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यापूर्वी याठिकाणच्या वस्तुंची केवळ शासकीय कार्यालयातच विक्री केली जात होती. आता ती प्रथमच या विक्री केंद्राद्वारे थेट नागरिकांना मिळणार असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक पवार यांनी ‘लोकमत’ला दिली. या वस्तुंची गुणवत्ताही चांगली असून ती माफक दरात विक्रीसाठी या शोरुममध्ये ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे टिकाऊ आणि स्वस्त अशा वस्तु ठाणेकरांना या कारागृहातून उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कैद्यांच्या वस्तू विक्री केंद्राचे उद्घाटन
By admin | Updated: October 22, 2014 22:47 IST