Join us
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या नवीन पत्रीपुलाचे सोमवारी उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:07 IST

कल्याण : शहरातील बहुचर्चित नवीन पत्रीपुलाचे सोमवार, २५ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण केले जाणार आहे, ...

कल्याण : शहरातील बहुचर्चित नवीन पत्रीपुलाचे सोमवार, २५ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण केले जाणार आहे, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. यावेळी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत.

ब्रिटिशकालीन जुना पत्री पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे रेल्वेने केलेल्या ऑडिटमध्ये उघड झाले होते. त्यामुळे तो पूल ऑगस्ट २०१८ मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये मेगाब्लॉक घेऊन पूल पाडण्यात आला; मात्र नवीन पूल उभारताना तांत्रिक अडचणींसह लॉकडाऊनचाही सामना करावा लागला. नवीन पुलासाठी ७०० टनचा गर्डर हैदराबाद येथे बनवून कल्याणला आणण्यात आला. अनंत अडचणींवर मात करीत पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी डॉ. शिंदे यांनी कंबर कसली. अखेरीस पुलाचे काम झाले असून, त्याचे लोकार्पण २५ जानेवारीला होणार आहे.

पुलाचे काम रखडल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासावर अनेकांनी गाणीही तयार केली होती, तसेच विरोधकांनी पुलाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ आंदोलने करत शिवसेनेला लक्ष्य केले होते. दरम्यान, पत्रीपुलाला जोडणारा कल्याण-ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्याचा अप्रोच रोडही आता पूर्णत्वास आला आहे. पत्री पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर वाहतूक कोंडी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.

तिसऱ्या पुलाच्या कामाला लवकर सुरुवात

नवीन पूल व सध्याचा पूल असे दोन्ही पूल मिळून कल्याण-शीळ रस्त्याच्या चार लेन होत आहेत; मात्र भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता सहा पदरी असून, त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे तिसऱ्या पुलासाठी नवीन पत्रीपुलाच्या बाजूला आणखीन एक तिसरा रेल्वे उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्याचे काम लवकर सुरू केले जाणार आहे.

फोटो : २२ कल्याण-पत्री पूल