Join us  

मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अटल स्मृती उद्यानाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 4:10 AM

बोरीवली पश्चिमेतील शिपोली येथे एकेकाळी डम्पिंग ग्राउंड असलेल्या मैदानावर तब्बल साडेचार एकर परिसरात हे उद्यान उभारले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी बोरीवली येथे अटल स्मृती उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी दोन्ही नेत्यांनी माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा दिला.बोरीवली पश्चिमेतील शिपोली येथे एकेकाळी डम्पिंग ग्राउंड असलेल्या मैदानावर तब्बल साडेचार एकर परिसरात हे उद्यान उभारले आहे. या उद्यानात वाजपेयी यांच्या जीवनाच्या विविध पैलूंचा आणि कर्तृत्वाचा आलेख मांडण्यात आला आहे. अटल स्मृती आजच्या तरुण पिढीला निश्चित प्रेरणादायी ठरेल, असे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले. वाजपेयींचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी व कणखर होते. नवभारताची निर्मिती करून जगात भारताला एक आगळेवेगळे स्थान त्यांनी मिळवून दिले. जागतिक दबावाची पर्वा न करता त्यांनी पोखरण अणुचाचणी यशस्वी करून दाखविली. उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून उद्यानाची निर्मिती झाली. याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्या कारकिदीर्तील हे त्यांनी उभारलेले ‘अटल स्मृती उद्यान’ हे सर्वोत्तम असेल.उद्धव ठाकरे म्हणाले की, अटलजी फक्त भाजपचे नेते नव्हते. त्यांचे नेतृत्व देशव्यापी होते.वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी अपार कष्ट केले, त्याची फळे आज आपण उपभोगतो आहोत. या वेळी शिवसेनेच्या विभाग क्रमांक एककडून मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांना ‘गदा’ भेट देण्यात आली. याचा संदर्भ देत, आमची युती असून ही गदा विरोधकांना गदागदा हलवेल. तसेच शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांवरदेखील गदा येणार नाही, असे ठाकरे म्हणाले. या वेळी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांचे विशेष स्वागत करण्यात आले.

टॅग्स :मुंबई