Join us  

मध्यरात्री ‘तिच्या’ऐवजी सलमानला आला थेट पोलिसांचाच फोन

By मनीषा म्हात्रे | Published: November 29, 2022 9:12 AM

पोलिसांच्या कारवाईमुळे या मजनूचे प्रेमाचे वेड उतरले असून मुलीनेही सुटकेचा नि:श्वास सोडला.

मनीषा म्हात्रे 

मुंबई : तिच्या एका कटाक्षाने प्रेमात पडलेल्या मजनूने थेट तिचा पाठलाग सुरू केला. सुरुवातीला तिला याची कल्पना नव्हती. मात्र, आपला पाठलाग केला जातोय, हे लक्षात येताच ती घाबरली. मजनूने तिला रस्त्यात अडवून आपला मोबाइल नंबर असलेली चिठ्ठी दिली. तिचा फोन येईल असे वाटत असताना ही चिठ्ठी पोलिसांकडे पोहोचली. तिच्या कॉलची वाट पाहणाऱ्या मजनूला रात्री थेट पोलिसांचाच फोन आला आणि त्यानंतर पोलिस कोठडीची हवा खावी लागली. 

पोलिसांच्या कारवाईमुळे या मजनूचे प्रेमाचे वेड उतरले असून मुलीनेही सुटकेचा नि:श्वास सोडला. अंबोली पोलिसांनी याप्रकरणी सलमान कुरेशी (३०) यास बेड्या ठोकल्या आहेत. २६ नोव्हेंबरला दुपारी चारच्या सुमारास तो मित्राला भेटायला गेला. त्याच, दरम्यान १५ वर्षीय मुस्कान (नावात बदल) मैत्रिणीसोबत खासगी शिकवणीवरून घरी निघाली. तेव्हा रस्त्याच्या बाजूला कारमध्ये बसलेल्या सलमानने मुस्कानच्या दिशेने बोट दाखवून इशारा करून हसला. त्यामुळे दोघीही घाबरल्या. त्यांनी तत्काळ रिक्षा पकडून घराची वाट धरली. सलमाननेही तिचा पाठलाग सुरू केला. पुढे, काही अंतरावर तो कारमधून बाहेर आला. त्याने रिक्षा चालकाला थांबण्यास सांगितले. मात्र, मुस्कानने चालकाला रिक्षा न थांबवता थेट पुढे नेण्यास सांगितले. त्यानंतरही, सलमानने कारमधून तिचा पाठलाग सुरू ठेवला. वाहतूक कोंडीत मुस्कानची रिक्षा थांबल्याची संधी साधून त्याने एक चिठ्ठी तिच्या बॅगवर ठेवून ‘ये मेरा नंबर है’, असे सांगून निघून गेला. मुस्कानने घर गाठून हा प्रकार वडिलांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वडिलांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी मोबाइल क्रमांकाच्या आधारे शोध सुरू केला. 

...तर तुमच्यावरही दाखल होतील हे गुन्हे?  मध्यरात्री दोनच्या सुमारास मोबाइलवर धडकलेला अनोळखी कॉल पाहून त्याच्या मनात उकळ्या फुटल्या.  त्या मुलीचाच फोन असल्याचे समजून त्याने तो उचलला. मात्र, प्रत्यक्षात तो फोन पोलिसांचा निघताच त्याची प्रेमाची नशा उतरली.  पोलिसांनी त्याला विनयभंग, पोक्सोच्या कलमाअंतर्गत बेड्या ठोकल्या आहेत. 

सलमानसह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, सलमानला अटक करत त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. - बंडोपंत बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबोली पोलीस ठाणे  

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी