Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' नाटकाला प्रथम पारितोषिक, ३२ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचा निकाल जाहिर

By संजय घावरे | Updated: March 14, 2024 17:15 IST

अखेर ३२ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.

संजय घावरे, मुंबई : ३२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‍जिगिषा क्रिएशन्स संस्थेच्या 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावत ७ लाख ५० हजार रुपयांच्या पारितोषिकावर नाव कोरले आहे. 'आमने सामने' या नाटकाने द्वितीय, तर 'सर, प्रेमाचं काय करायचं' या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. 

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे नाट्य स्पर्धेचा निकाल घोषित केला आहे. यात अवनीश, अथर्व, नाटकमंडळी संस्थेच्या 'आमने सामने' नाटकाला ४ लाख ५० हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक, तर मकरंद देशपांडे नाटकवाला आणि व्ही. आर. प्रॉडक्शन्सच्या 'सर, प्रेमाचं काय करायचं' नाटकाला ३ लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक जाहिर झाले आहे. 

उत्कृष्ट अभिनेत्याला दिला जाणारा रौप्यपदक व ५० हजार रुपयांचा पुरस्कार रोहन गुजर - आमने सामने, मंगेश कदम - आमने सामने, विशाल तांबे - प्रेम करावं पण जपून, मकरंद देशपांडे - सर, प्रेमाचं काय करायचं, निनाद लिमये - सर, प्रेमाचं काय करायचं यांना घोषित झाला आहे. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार वंदना गुप्ते - हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, दिप्ती लेले - हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, लिना भागवत - आमने सामने, निर्मिती सावंत - व्हॅक्युम क्लीनर, आकांक्षा गाडे - सर, प्रेमाचं काय करायचं या अभिनेत्रींनी पटकावला आहे. 

तांत्रिक विभागातील इतर पारितोषिके प्रथम, द्वितीय, तृतीय अशी अनुक्रमे पुढीलप्रमाणे जाहिर झाली आहेत. दिग्दर्शनासाठी चंद्रकांत कुलकर्णी - हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, मकरंद देशपांडे - सर, प्रेमाचं काय करायचं, ‍निरज शिरवईकर - आमने सामने, नाट्यलेखनासाठी स्वरा मोकाशी - हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, ‍निरज शिरवईकर - आमने सामने, मकरंद देशपांडे - सर, प्रेमाचं काय करायचं, प्रकाश योजनेसाठी अमोल फडके - सर, प्रेमाचं काय करायचं, किशोर इंगळे-मयुर इंगळे - आमने सामने, शिवाजी शिंदे - प्रेम करावं पण जपून, नेपथ्यासाठी टेडी मौर्या - सर, प्रेमाचं काय करायचं, प्रदीप मुळे - तू म्हणशील तसं, प्रदीप मुळे - व्हॅक्युम क्लीनर, संगीत दिग्दर्शनासाठी अशोक पत्की नाटक - हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, शैलेश बर्वे - सर, प्रेमाचं काय करायचं, मनोहर गोलांबरे - दर्याभवानी, वेशभूषेसाठी अमीता खोपकर - आमने सामने, प्रतिमा जोशी - हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, कलीका विचारे - दर्याभवानी, रंगभूषेसाठी उल्लेश खंदारे - व्हॅक्युम क्लीनर, उदयराज तांगडी - दर्याभवानी, उल्लेश खंदारे - हरवलेल्या पत्त्यांचा बंगला यांना मिळाला आहे.

श्री शिवाजी मंदिरमध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीत सात व्यावसायिक नाटके सादर करण्यात आली. या स्पर्धेला परीक्षक म्हणून शिवदास घोडके, रवींद्र आवटी, विजय कदम, प्रदीप कबरे व मुग्धा गोडबोले यांनी काम पाहिले.

टॅग्स :मुंबईनाटक