Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्पेक्ट्रम'मधून उलगडले जीवनाचे तत्त्वज्ञान! 

By स्नेहा मोरे | Updated: December 5, 2023 18:57 IST

भिसे यांची रंग, ब्रश आणि माध्यमांवरील पकड कॅनव्हासवर अद्भुत छायानाटय तयार करते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - ज्येष्ठ चित्रकार जेजे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी प्रकाश भिसे यांच्या स्पेक्ट्रम या चित्रप्रदर्शाचे आयोजन जहांगीर कला दालनात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जीवनाचे तत्वज्ञान कॅनव्हासवर रेखाटण्यात आले आहे. या निमित्ताने एकाच वेळी कला रसिकांना वास्तववादी आणि अमूर्त शैलीची सांगड घातलेली दिसून येत आहे. कला रसिकांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत ११ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन खुले राहिल.

चार दशकांपासून प्रकाश भिसे हे चित्रकलेच्या क्षेत्रात ठसा उमटवत आहेत. त्याचबरोबर रहेजा स्कूल ऑफ आर्ट येथून ते प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. या प्रदर्शनात त्यांच्या सुमारे ४८ अमूर्त चित्रांचा कला रसिकांना आस्वाद घेता येईल. भिसे हे २००० सालापासून ऍबस्ट्रॅक्ट शैलीमध्ये काम करतात. त्यापूर्वी त्यांनी अनेक विषय वास्तववादी शैलीतून कॅनव्हासवर मांडले आहेत.

प्रकाश भिसे यांची चित्र लघुचित्रशैलीचा वारसा असलेल्या भारतीय चित्रशैलीशी नाते सांगतात. प्रदर्शनात त्यांनी जीवनातील अनुभवांवर अमूर्त रूपातील चित्र भाष्य केले आहे. यामध्ये मानवी सुख दुःख, निसर्ग, निसर्गाची हिरवाई, ते थेट युक्रेन रशिया युद्ध यांचे पडसाद भिसे यांच्या कॅनव्हासवर पाहायला मिळतील. भिसे यांच्या स्पेक्ट्रम प्रदर्शनात त्यांनी रंगांचा मुक्त वापर केला आहे. चित्रकाराचे जीवनानुभव त्याचे जीवन तत्वज्ञान अस्फुटपणे त्याच्या चित्राकृतीतून व्यक्त होत असतात. प्रकाश भिसे यांचे आयुष्य हे जीवनानुभवांनी समृद्ध आहे. भिसे यांची चित्रे ही कला रसिकाला जबरदस्त चैत्रीक अनुभूती देतात. भिसे यांची रंग, ब्रश आणि माध्यमांवरील पकड कॅनव्हासवर अद्भुत छायानाटय तयार करते.

टॅग्स :मुंबई