Join us  

खेळता खेळता कारमध्ये गेले अन् भावंडांनी गमावला जीव; दरवाजा लॉक झाल्यानं आतच गुदमरले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 7:10 AM

अँटॉप हिल येथील दुर्दैवी घटना, अँटॉप हिल येथील सीजीएस कॉलनीतील सेक्टर ५ मध्ये शेख कुटुंबीय राहण्यास आहे. मोहब्बत शेख हे मिस्त्रीकाम करतात.

मुंबई : अँटॉप हिलमध्ये बेपत्ता झालेल्या भावंडांचा घरासमोरच धूळखात पडलेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. खेळता खेळता कारमध्ये गेले आणि दरवाजा लॉक झाल्याने दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली असून पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली  आहे.  

अँटॉप हिल येथील सीजीएस कॉलनीतील सेक्टर ५ मध्ये शेख कुटुंबीय राहण्यास आहे. मोहब्बत शेख हे मिस्त्रीकाम करतात. या दुर्घटनेत त्यांच्या साजीत आणि मुस्कान या सात व पाच वर्षीय मुलांचा मृत्यू झाला आहे. नेहमीप्रमाणे दोघेही सकाळी १० वाजता खेळण्यासाठी घराबाहेर पडले. दुपारच्या सुमारास त्यांचा जेवणासाठी शोध घेतला. मात्र, ते आढळून आले नाहीत. लंगरमध्ये जेवायला गेल्याच्या समज करून त्यांनी दुर्लक्ष केले. सायंकाळ झाली तरी मुले घरी न आल्याने त्यांना संशय आला. मुलांचा सर्वत्र शोध घेतला; मात्र, ती आढळून आली नाहीत. अखेर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी अँटॉप हिल पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून मुलांचा शाेध सुरू केला. 

तपासादरम्यान पाेलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये मुले बाहेर जाताना दिसून आली नाहीत. त्यामुळे ती जवळपास असल्याच्या शक्यतेतून आजूबाजूच्या झुडपांसह कुठे खड्ड्यात पडली का? यादृष्टीने तपासणी सुरू केली. अखेर, एका महिला पोलिसाने येथे धूळखात पडलेल्या वाहनांवर लाईट मारताच त्यातील एका वाहनात दोन्ही मुले दिसून आली. पोलिसांनी तत्काळ दरवाजा उघडून दोघांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

मुले नेहमीप्रमाणे घराजवळील गार्डनमध्ये खेळायला गेली असतील असे वाटले. मात्र, जेवणासाठी बोलवायला गेल्यानंतर दोघे दिसले नाहीत. तेथून कदाचित जीटीबीनगर येथे लंगरसाठी गेले असावेत म्हणून शोध घेतला नाही. मात्र, उशिरापर्यंत न आल्याने काळजी वाटली. मुलांसोबत असे होईल, असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. - मोहब्बत शेख, मृत मुलांचे वडील