Join us  

दरडी कोसळणाऱ्या ठिकाणांवर ‘वॉच’, २५ नियंत्रण कक्ष राहणार तयार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 9:56 AM

मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असलेली संभाव्य ठिकाणे आहेत.

मुंबई : मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असलेली संभाव्य ठिकाणे आहेत. या ठिकाणांवर ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात २५ विभाग पातळीवर नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. हे समर्पित नियंत्रण कक्ष सर्व उपकरणांसह सुसज्ज ठेवावेत, अशा सूचना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिल्या आहेत. 

पावसाळ्यात दरडी कोसळून अपघात होऊ नये, यासाठी संबंधित ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे काम विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर योग्य समन्वय साधून आवश्यक उपाययोजना कराव्यात.  २४ विविध प्रशासकीय विभागांत आपत्कालीन घटनांची आणि त्या पार्श्वभूमीवर आवश्यक मदत यंत्रणेची गरज भासू शकते. या पार्श्वभूमीवर कक्षामध्ये आवश्यक साधन सामग्री आणि उपकरणे पुरवली जाणार आहेत. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत कार्य करता येईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.    

राडारोड्याचा अडथळा नको-

एमएमआरडीएच्या अखत्यारीतील विविध कामे आणि मेट्रो रेल्वे इत्यादी प्रकल्पांच्या ठिकाणी राडारोडा पडून राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी. त्याचबरोबर वाहतूक पूर्ववत होण्याकामी, स्थानिक कामे झाल्यावर बॅरिकेड्स काढावीत, याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. 

पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्ग सुस्थितीत ठेवा-

मुंबई पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी पालिकेवर आहे. त्यामुळे दोन्ही द्रुतगती मार्ग सुस्थितीत असावेत, याची खबरदारी मध्यवर्ती यंत्रणेसह सहायक आयुक्त आणि उपआयुक्तांनी घ्यावी, अशा सूचना पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकाभूस्खलन