Join us  

घरगुती मसाल्यांसाठी महिलांचा ‘मसाला गल्ली’कडे मोर्चा, भाव आटोक्यात; गृहिणींना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:35 AM

उन्हाची झळ लागायला सुरुवात झाली की, महिलांकडून वाळवणे, मसाले बनवण्याची तयारी सुरू होते.

मुंबई : उन्हाची झळ लागायला सुरुवात झाली की, महिलांकडून वाळवणे, मसाले बनवण्याची तयारी सुरू होते. दररोजच्या जेवणासाठी लागणारा लाल मसाला हा प्रत्येकाच्या घरात लागतोच. प्रत्येकाच्या मसाला बनवण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मसाला बनवून घेतात, मागील काही वर्षांत एकीकडे ‘रेडिमेड’चा जमाना वाढत असला तरीही अजूनही घरगुती पद्धतीने मसाले तयार करण्यासाठी महिलांचा अधिक कल आहे. 

अनेकदा ऐन हंगामामध्ये मिरचीचे भाव वाढत असल्यामुळे महिला वर्ग आधीपासूनच मिरची खरेदी करून तिला  उन्हात वाळवून मग आवश्यकतेनुसार त्यामध्ये गरम मसाला, धने, बडीशेप आदी पदार्थ एकत्र करून मसाला तयार करून घेतात. यंदा अजून तरी मिरचीचे भाव आटोक्यात असल्याने मसाल्यांच्या तयारीला वेग आला असून, तिखट बनवण्यासाठी  लागणाऱ्या मसाल्यांची आवक बाजारपेठेत झाली आहे. यंदाही लालबागच्या मसाला गल्लीत मुंबईत उन्हाचा पारा चढूनही महिलांची वर्दळ वाढली असूनही संपूर्ण गल्ली मसाल्याचा गंध पसरला आहे.

स्वयंपाकाला चव-

मिरची, मिरची पूड, खडा मसाला या महत्त्वाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. साधारणपणे मार्चमध्ये घराघरांत तिखट बनवण्याची घाई सुरू होते. मिरची खरेदीपासून तिखटासाठी लागणाऱ्या पदार्थांच्या खरेदीची सुरुवात केली जाते. 

मसाल्याच्या गिरणीत बनविलेल्या मसाल्याने स्वयंपाकाला विशिष्ट चव येते, हे माहीत असल्याने हल्ली अनेक जण मोठ्या प्रमाणात मसाला बनवून नंतर त्याचे कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये वाटप करतात, असे महिला सांगतात. त्यामुळे मार्चअखेरपासूनच गृहिणींची मिरची खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे. 

लालबागच्या मसाला गल्लीत मुंबईत उन्हाचा पारा चढूनही महिलांची वर्दळ वाढली आहे. संपूर्ण गल्लीत मसाल्याचा गंध पसरला आहे.

यंदा भाव आटोक्यात, अजून तरी दिलासा-

मसाल्यात वापरण्यात येणाऱ्या लाल मिरचीने यंदा गृहिणींना दिलासा दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरची यावर्षी स्वस्त झाली आहे.  गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरचीचे दर अक्षरशः निम्म्याने कमी झालेत. त्यामुळे तडका देण्यासाठी लागणारी अख्खी मिरची असो वा मसाल्यात वापरली जाणारी मिरची पावडर याचा गृहिणींच्या बजेटवर अजिबात परिणाम होणार नाही. - मसाला व्यावसायिक, लालबाग

असे आहेत दर (प्रतिकिलो)-

काश्मिरी मिरची                   ६०० ते ७०० 

बेडगी मिरची                       २५० ते ३०० 

गंटूर तेजा मिरची                  २०० ते ३०० 

संकेश्वरी मिरची                     २५० ते ३५० 

टॅग्स :मुंबईबाजार