Join us  

'कोस्टल'चे महिनाभरात रडगाणे; भुयारी मार्ग पावसाळ्याआधीच तुंबला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 9:46 AM

हाजीअलीकडे जाणारे भाविक त्रस्त.

मुंबई : बहुचर्चित सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) जनतेसाठी खुला करण्याची घाई मुंबई महानगरपालिकेच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या मार्गादरम्यान हाजीअली येथे असलेला भुयारी मार्ग बुधवारी भरतीच्या वेळी पाण्याखाली गेला. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईच्या काही भागात पाणी साचण्याचा धोका कोस्टल रोडमुळे टळेल या पालिकेच्या दाव्यापुढे प्रश्नचिन्ह उभे तर राहिलेच शिवाय आता काही ठिकाणी मार्गाला तडेही गेल्याचे दिसून आले आहे.

हाजीअली दर्याकडे जाणारा जवळपास ५० टक्के मार्ग हा कोस्टल रोडच्या खालून जातो. दर्याकडे जाणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून, यासाठी पालिकेने तेथे भुयारी पादचारी मार्ग बांधला आहे. मात्र, तेथे पादचाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यायला पालिकेला वेळ मिळाला नसल्याची टीका होत आहे.

मागील चार वर्षे या भुयारी मार्गात पाणी साचत असून, दर्याचे अधिकारी स्वतः ते पाणी काढून मार्ग खुला करत आहेत, असे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर म्हणाले. पावसाळ्यात पालिकेकडून पंप बसविले जातात. मात्र पावसाळा संपताच ते काढून नेले जातात. त्यामुळे दर्यात येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या पादचारी रस्त्यावर समुद्राच्या भरतीचे पाणी येऊ नये, यासाठी पालिकेकडून मुख्य पर्जन्य वाहिनीचे बांधकाम सुरू आहे. समुद्राचे अतिरिक्त पाणी गोळा करण्यासाठी येथे टाकी बांधून, नंतर ते पाणी समुद्रात सोडून देण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

बुधवारी दुपारी १ च्या सुमारास भरतीच्या वेळी हा भुयारी मार्ग पाण्याखाली गेला. मात्र आपण या समस्येच्या बाबतीत वर्षभर कोस्टल रोड आणि एल अॅण्ड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहोत. पालिकेकडून याबाबतीत कोणतीही हालचाल होत नाही. त्यामुळेच भरतीच्या वेळी पाणी काढावे लागते, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले.

रस्त्याला भेगा?

सुमारे १३ हजार कोटी खर्चुन बांधला जात असलेल्या कोस्टल रोडच्या वरळी ते मरिन ड्राइव्ह हा नऊ किलोमीटरचा पहिल्या टप्पा ११ मार्च रोजी खुला झाला. महिनाभरातच रस्त्यावर भेगा दिसू लागल्या आहेत. वाहतूक सुरू होताच मरिन ड्राइव्हच्या टप्प्यात रस्त्यावर या भेगा कशा दिसू लागल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याऱ्यांशी संपर्क केला असता या संरचनात्मक भेगा नसून किरकोळ तडे आहेत. हे तडे 'इपॉक्सी'चा वापरून भरल्याचे त्यांनी सांगितले.

४ वर्षांत कोणतीही सुविधा नाही-

मागील चार वर्षांपासून कोस्टल रोडचे काम सुरू आहे. या कामामुळे त्रास होऊ नये, म्हणून हाजीअलीकडे जाणाऱ्या मार्गावर शेड बांधली जाणार होती. त्याचेही काम सुरू झालेले नाही. शिवाय भुयारी पादचारी मार्गात पादचाऱ्यांसाठी चार हॅलोजन दिव्यांशिवाय कोणतीही सुविधा नाही. या मार्गात हवा खेळती राहण्यासाठी अद्यापही प्रणाली बसवलेली नाही.

टॅग्स :मुंबईनगर पालिका