Join us

मुंबई विमानतळावरील कोरोना चाचणी घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:06 IST

अन्यथा लोकायुक्तांकडे दाद मागणार; काँग्रेस नगरसेवकाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विमानतळावर सुरू असलेल्या कोरोना चाचणी घोटाळ्याची ...

अन्यथा लोकायुक्तांकडे दाद मागणार; काँग्रेस नगरसेवकाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विमानतळावर सुरू असलेल्या कोरोना चाचणी घोटाळ्याची निःपक्षपातीपणे चौकशी करा, अन्यथा लोकायुक्तांकडे दाद मागण्याचा इशारा काँग्रेस नगरसेवक सुफियान वनू यांनी दिला आहे. शिवाय पालिकेच्या आगामी अधिवेशनात या प्रश्नावरून पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विमानतळावरच्या प्रयोगशाळेतील कर्मचारी आणि तेथे तैनात असलेले पालिका अधिकारी संगनमत करून कोरोनाची लागण न झालेल्या प्रवाशाचा अहवाल पॉझिटिव्ह दाखवतात आणि खासगी हॉटेलमध्ये विलगीकरणाची सक्ती करतात. हॉटेल मालकांच्या फायद्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. याविषयी पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. सर्वप्रकारचे पुरावे सादर केले. मात्र, ज्या अधिकाऱ्याचा या प्रकरणात सहभाग असल्याचा मला संशय आहे, त्यालाच चौकशी अधिकारी नेमण्यात आले. ही बाब गंभीर असून, या प्रकरणाची तत्काळ निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.

येत्या काही दिवसात या संदर्भात निर्णय न झाल्यास लोकायुक्तांकडे दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय पालिकेच्या आगामी अधिवेशनात या विषयावर आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

* प्रकरण काय?

विमानतळावरील प्रयोगशाळेने पॉझिटिव्ह घोषित केलेल्या महिलेला सुफियान वनू यांनी पालिकेच्या रुग्णालयात नेत पुन्हा चाचणी केली. अवघ्या सात तासांत तिची चाचणी निगेटिव्ह आली. याची खातरजमा करण्यासाठी एका खासगी प्रयोगशाळेत त्याचदिवशी तिसऱ्यांदा चाचणी करण्यात आली. तीही निगेटिव्ह आल्याने मुंबई विमानतळावर कोरोना चाचणी घोटाळा सुरू असल्याचा आरोप वनू यांनी केला.

....................................................