Join us  

महापालिकेच्या रणनीतीच्या आखणीला मनसेची सुरुवात; राज ठाकरेंनी बैठकीत दिले महत्वाचे आदेश

By मुकेश चव्हाण | Published: January 12, 2021 1:28 PM

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील सदस्यांना संबोधत महानगरपालिकांनुसार टीम स्थापन करण्याचे आदेश दिले आहे.

मुंबई: राज्यात सुरू असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका आणि आगामी काळात असणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वपूर्ण बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे सुरु आहे. या बैठकीत मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी पक्षातील सदस्यांना संबोधत महानगरपालिकांनुसार टीम स्थापन करण्याचे आदेश दिले आहे.

पाच महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी टीम तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय़ या बैठकीत घेण्यात आला. नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, कार्यकर्ते यांचा या टीममध्ये सहभाग असेल. प्रत्येक शहरानुसार ही टीम तयार करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याची माहिती समोर आली आहे. 

येत्या काही महिन्यात राज्यात कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, वसई-विरार,  नवी मुंबई आणि औरंगाबाद या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे राज ठाकरेंनी पक्षसंघटन वाढीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या परिसरातील स्थानिक राजकीय माहिती, समस्या आणि मनसेचे कार्य याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी कोणत्याही मुद्द्यावर भाष्य केले नव्हते, कोरोना काळात अनेकांनी समस्या सोडवण्यासाठी कृष्णकुंजवर धाव घेतली होती, त्यात कोळी बांधव, बॅन्जो पथक, डॉक्टर, वारकरी, महिला अशा विविध गटांचा समावेश होता, राज ठाकरेंनी विषय घेतला आणि तो मार्गी लागला अशी चर्चा सातत्याने सुरू होती, दरम्यानच्या काळात वीजबिलावरून राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेत वीजबिलात कपात करण्याची सूचना सरकारला द्यावी अशी मागणी केली होती.

राज ठाकरेंच्या संरक्षणासाठी मनसैनिक सरसावले-

मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी पुन्हा सरसावले आहेत, मागील सरकारच्या काळात राज ठाकरेंची सुरक्षा कमी केल्यानंतर मनसैनिकांना दिवसरात्र राज ठाकरेंना संरक्षण दिलं होतं, त्यावेळी प्रत्येक विभागातील पदाधिकारी टप्प्याटप्प्याने राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी संरक्षण देण्यासाठी हजर राहत होते, त्याचप्रमाणे आताही मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसेच्या महाराष्ट्र रक्षक पथकाची स्थापना केली आहे.

महाराष्ट्र रक्षक नावाने टी-शर्ट छापून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना संरक्षण देणार आहेत, बोरिवली-कांदिवली परिसरातील हे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर तैनात होते, सरकारच्या निर्णयाचा सरचिटणीस नयन कदम यांनी जोरदार विरोध करत आम्ही महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांच्या सुरक्षेसाठी सदैव जागरूक आहोत असं सांगितले आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसेनगर पालिकानिवडणूक