Join us  

गुंडगिरी टाळण्यासाठी कॉलेजात आचारसंहिता लागू करा- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 4:23 AM

महाविद्यालयांमध्ये डावे, उजवे, कम्युनिस्ट, आंबेडकरी अशा विचारधारा जरूर असाव्यात.

मुंबई : महाविद्यालयांमध्ये डावे, उजवे, कम्युनिस्ट, आंबेडकरी अशा विचारधारा जरूर असाव्यात. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करून त्याचे राजकारण करत गुंडागर्दी व्हायला नको. त्यासाठी आचारसंहिता असायला हवी, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी व्यक्त केले. जेएनयूतील हिंसाचाराचा निषेध करतानाच हिंसाचाराच्या विरोधातील आंदोलनात ‘फ्री काश्मीर’चे फलक झळकाविणेही चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले.नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) समर्थन, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, मागासवर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे पूर्वेतील संविधान निवासस्थान ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या वेळी आठवले यांनी महाविद्यालयांमध्ये आचारसंहिता लागू करण्याची मागणी केली. सीएएला आरपीआयचा पाठिंबा असल्याचे सांगत आठवले म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये नामशूद्र या दलित वर्गाने बांगलादेशात आपल्यावर अन्याय होत असल्याने भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी केली होती. पाकिस्तानमध्ये नुकतीच गुरुनानकांच्या जन्मस्थळी नानाकाना साहिब या पवित्र गुरुद्वारावर दगडफेक झाली. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या मुस्लीमबहुल देशांत अल्पसंख्याक असलेल्या हिंदू, दलित, शीख, बौद्ध, ख्रिश्चन या अल्पसंख्याक धर्मीयांवर अत्याचार होतात. त्यामुळे तेथून भारतात आलेल्या शरणार्थींना माणुसकीच्या नात्याने नागरिकत्व दिले पाहिजे. त्यासाठी कायदा करण्यात आला. त्यात या तिन्ही देशांतील मुस्लिमांना वगळले आहे. तसे केले नसते तर सरसकट येथील मुस्लिमांना नागरिकत्व द्यावे लागून देशाची सुरक्षा धोक्यात आली असती, असे आठवले यांनी स्पष्ट केले. नागरिकत्व सुधारणा कायदा, मागासवर्गीयांचे कर्ज माफ करा आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, या मागण्यांसाठी आरपीआयने राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

टॅग्स :रामदास आठवले