Join us  

महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव शोधप्रबंधांवर कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 6:56 AM

सत्य, अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधींच्या विचारांचा पगडा आजही बहुसंख्य तरुणाईवर आहे.

- सीमा महांगडेमुंबई : सत्य, अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधींच्या विचारांचा पगडा आजही बहुसंख्य तरुणाईवर आहे. म्हणूनच गांधीजी, त्यांचे विचार, तत्त्वज्ञान, त्यांचे राहणीमान व जीवन यावर सर्वाधिक संशोधन व पीएच.डी. केल्या गेल्याचे समोर आले आहे. मुंबई विद्यापीठातील विविध विभागांतील विद्यार्र्थ्यांनीही गांधींच्या जीवनातील विविध पैलू आणि विषयांवर प्रबंध लिहिल्याची माहिती संकलनातून समोर आली आहे.मुंबई विद्यापीठात अगदी १९७४ पासून इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासनशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भाषाशास्त्र आदींसह मानव्य विद्या शाखेतील विविध विषयांतील पदवी घेणाºया विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींवर सर्वाधिक संशोधन केले असून प्रबंध लिहिले आहेत. गांधी आणि समकालीन भारतीय तत्त्वज्ञान, महात्मा गांधींच्या दांडी यात्रा आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास, गांधींचे आत्मचरित्रात्मक साहित्य, समाज जीवनातील इस्लामिक आणि गांधी पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास, महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानातून शांतता आणि करुणा प्रस्थापित करण्याचा दृष्टिकोन अशा विविध शीर्षकांतर्गत विद्यार्थ्यांचे प्रबंध मुंबई विद्यापीठात उपलब्ध आहेत.गांधींचे साहित्य, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून सद्य:स्थितीत भेडसावणाºया विविध समस्या आणि त्यावरील उपायांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न विद्यार्थी याद्वारे करत आहेत, असेच या प्रबंध आणि शोध साहित्यातून समोर येत आहे.गांधींचे तत्त्वज्ञान आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरत असल्यानेच आजही विद्यापीठात महात्मा गांधींसंबंधित विषयावर शोध प्रबंध घेऊन शिक्षण घेतले जात असल्याची प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या निवृत्त प्राध्यापिका व विभागप्रमुख शुभदा जोशी यांनी दिली.जगभरातील गांधीजींच्या प्रबंधांचे संकलनमुंबई विद्यापीठातच नाही तर जगभरात महात्मा गांधींवर शोधप्रबंध उपलब्ध आहेत. १ कोटी ४४ लाख ७३ हजार ७०९ शोधप्रबंधांपैकी ५००९ आॅनलाइन शोधप्रबंध महात्मा गांधींवर असून ते औरंगाबाद विद्यापीठाकडून संकलित केले जात असल्याची माहिती ग्रंथपाल डॉ. धर्मराज वीर यांनी दिली.यामध्ये जगभरातील महात्मा गांधी यांच्यावर लिहिलेली १२६४ ई-बुक्स ग्रंथालयाने संकलित केली आहेत. यात मराठी ८१, इंग्रजी ६१५, हिंदी १७५, गुजराती १४३ आणि इतर २५० भाषांतील ग्रंथांचा समावेश आहे. आॅडिओ बुक्सची संख्या २२ एवढी आहे तर व्हिडीओच्या स्वरूपातील ११ भाषणे आहेत. महात्मा गांधींवरचा एक हिंदी चित्रपटही उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. वीर यांनी सांगितले.जगभरातील विविध विद्यापीठांत गांधींवर पीएच.डी.साठी संशोधन झाले. जगातील २६४ पीएचडीचे संशोधन ग्रंथ संकेतस्थळावर आहेत. त्यात एनडीएलटीडी ६९, ओपन थिसिस २१ आणि ओएटीडीवरील २३ थिसिस आदींचा समावेश आहे.औरंगाबाद विद्यापीठाने संकलित केलेल्या आॅनलाइन ग्रंथांमध्ये सत्याचे प्रयोग, महात्मा गांधींचे विचार, पंचायतराज, सर्वोदय, नैतिक धर्म, गीता बोध, बापू माझी आई, सूर्यासमोर काजवा, प्रार्थना प्रवचन भाग- १, २, बापूंचे आशीर्वाद अशा विविध प्रसिद्ध ग्रंथांचा समावेश आहे.

टॅग्स :महात्मा गांधी