राजू काळे, भार्इंदरपालिकेच्या प्रभाग समिती क्र. ६ मधील काशी व चेना परिसरात अवैध बांधकामे केल्याप्रकरणी ७ जणांवर एमआरटीपी (मोनोपोलिस्टीक अॅण्ड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस अॅक्ट) कायद्यान्वये गुन्हे दाखल करून काही बांधकामे जमीनदोस्त केल्याची माहिती प्रभाग अधिकारी दादासाहेब खेत्रे यांनी दिली.चेना गावातील मोरे नामक व्यक्तीने चेना नदीपात्रातच बेकायदेशीर मातीचा भराव केला असून ही जागा राज्य शासनाच्या वन व महसूल विभागांची आहे. काही महिन्यांपूर्वी लोकमतमध्ये त्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मोरे या व्यक्तीने ती जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करून वृत्तालाच खोटे ठरविण्याचा अनाठायी प्रयत्न चालविला होता. त्या वेळी महसूल विभागाने केवळ नोटीसची कारवाई करून वेळ मारून नेली होती. अखेर, पालिकेने त्यावर एमआरटीपी अन्वये गुन्हा दाखल केला असला तरी त्यात एक आरोपी अज्ञात व दुसऱ्या आरोपीचे नाव शौकत खान असे नोंदविण्यात आले आहे. तसेच अरुणकुमार कृपाशंकर श्रीवास्तव, देवनारायण लक्ष्मण ठाकूर व इतर दोन जणांनी याच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी केलेली बेकायदेशीर बांधकामे पालिकेने दोन वेळा तोडल्यानंतरही त्यांनी पुन्हा बांधकामे केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, काशीगाव परिसरातील विविध जागांवर अनधिकृत बांधकामे, कारवाईनंतर पुन्हा बांधण्यात आल्याने देवनाथ मुन्नार पाल व १० जण, दिनेश ओमप्रसाद मिश्रा, त्यांचे १० सहकारी व इतर ५ जण, मुकेश विश्वनाथ सिंग, त्यांचे सहकारी १० व इतर २ जणांवर यापूर्वी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही.
अवैध बांधकामे : ७ जणांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल
By admin | Updated: January 28, 2015 23:08 IST