Join us  

केरळ, नॉयडातील अवैध टेलिकॉम एक्स्चेंज उद्ध्वस्त; ७०० सिम कार्ड्स जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 3:34 AM

गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई : देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या अवैध टेलिकॉम एक्स्चेंजचे रॅकेट गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले आहे. केरळ आणि नॉयडातून हे रॅकेट कार्यरत होते. या कारवाई करत ७०० सिम कार्ड्स जप्त करण्यात आली.

जानेवारी, २०२० मध्ये मुंबईतील एका लँडलाइन क्रमांकावर सौदी अरेबियातून आलेला कॉल हा प्रत्यक्षात भारतातीलच मोबाइल क्रमांकावरून आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन दळवी, मनीष श्रीधनकर, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल चौगुले आणि अंमलदार यांची मिळून ३ पथके तयार करण्यात आली.

तपासात, यामागे केरळ आणि उत्तर प्रदेशचे कनेक्शन असल्याचे उघडकीस येताच, पथकाने तेथे छापा टाकला. तेथून ३२ स्लॉट्स असलेले ३ सिम बॉक्स, १२८ स्लॉट्स असलेले २ असे एकूण ५ सिम बॉक्स, तसेच त्या स्लॉटमधील ३५२ सिम कार्ड्ससह अतिरिक्त ३२५ सिम कार्ड्स, तसेच ३ लपटॉप, १ युपीएस, १ राउटर, १ मॉडेम आदी साहित्य जप्त केले. त्यापाठोपाठ नोएडा येथून ४ स्लॉट्स असलेले ३ सिम बॉक्स, त्यामध्ये ११ सिम कार्ड्स, १ हार्ड डिस्क, व्हिओआयपी अडॉप्टरही जप्त केले. ही मंडळी चांगरामकुलम व नॉयडा येथे समांतर टेलिकॉम ऑपरेशनअंतर्गत भारताबाहेरील आंतरराष्ट्रीय कॉल ‘सिम बॉक्स’मार्फत अवैधरीत्या भारतातील मुंबई व इतर शहरात जनरेट करून फसवणूक करत असल्याचे तपासाअंती उघडकीस आले आहे.

महागडे आंतरराष्ट्रीय कॉल स्वस्तात करणे शक्य

भारतातून आखाती देशांमध्ये जाणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. तेथून कुटुंब, नातेवाइकांशी संपर्क साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय कॉल करावा लागतो. त्याचे दर जास्त असतात. या अवैध टेलिकॉम एक्स्चेंजद्वारे हे कॉल अगदी स्वस्त होतात. त्यामुळे मजुर येथूनच कॉल करण्यास प्राधान्य देतात. मात्र, असे कॉल करणारे, शिवाय भारतात हे कॉल स्वीकारणारे कोण? यासह अन्य तपशिलांची कोणतीही नोंद कोठेही उपलब्ध होत नाही. सरकारी यंत्रणेला बगल देऊन राजरोसपणे हा धंदा सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे सरकारचा महसूल बुडतो. या टोळीने अशाच प्रकारे सरकारचा कोट्यवधीचा महसूल बुडविल्याचा प्राथमिक अंदाज असून, याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

टॅग्स :पोलिसअटकमुंबई