Join us

अंधेरीत तिवरांवर बेकायदा झोपड्या

By admin | Updated: February 8, 2015 00:48 IST

अंधेरी पश्चिम येथील तिवरांच्या झाडांची राजरोस कत्तल करून बेकायदा झोपड्या उभ्या राहत आहेत़ गेली काही वर्षे सुरू असलेल्या या प्रकाराबाबत तक्रार करूनही पालिका अधिकारी कानावर हात ठेवत आहेत़

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील तिवरांच्या झाडांची राजरोस कत्तल करून बेकायदा झोपड्या उभ्या राहत आहेत़ गेली काही वर्षे सुरू असलेल्या या प्रकाराबाबत तक्रार करूनही पालिका अधिकारी कानावर हात ठेवत आहेत़ विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे शिलेदार यशोधर फणसे यांच्याच वॉर्डात ही अवस्था आहे़ अंधेरी पश्चिम येथील गंगा-जमुना इमारतीसमोरील खाडीमध्ये तिवरांची असंख्य झाडे आहेत़ तिवरांचे वृक्ष पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने असे वृक्ष तोडण्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत़ मात्र गेल्या काही वर्षांपासून या खाडीतील तिवरांच्या झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू आहे़ या खाडीत अनधिकृत झोपड्या उभ्या राहत असल्याने स्थानिक रहिवाशांनी, स्वयंसेवी संस्थांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत़ मात्र २००४ पासून याबाबत तक्रार करूनही अद्याप पालिकेने कोणतीच कारवाई केलेली नाही़ त्यामुळे हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, अशी तक्रार या वेळीस खुद्द स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केली आहे़ सत्तेत असूनही गेली अनेक वर्षे त्यांना आपल्या वॉर्डातील बेकायदा झोपड्यांवर कारवाई करून घेणे शक्य झालेले नाही़ त्यामुळे हतबल फणसे यांनी थेट पर्यारणमंत्री रामदास कदम यांच्याकडे धाव घेतली आहे़ (प्रतिनिधी)