Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावातील शास्त्रीनगर नाल्यावर बेकायदा पार्किंग

By admin | Updated: November 23, 2015 01:49 IST

वाहनांच्या पार्किंगसाठी गोरेगाव पश्चिमेकडील द्वारका सोसायटीने चक्क शास्त्रीनगर येथील मुख्य नाल्यावरच बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुंबई : वाहनांच्या पार्किंगसाठी गोरेगाव पश्चिमेकडील द्वारका सोसायटीने चक्क शास्त्रीनगर येथील मुख्य नाल्यावरच बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे म्हाडाच्या मोतीलाल नगर क्र. १ वसाहतीतील ३ हजारांहून अधिक कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. सोसायटीला या नाल्यावर बांधकाम करण्यास खुद्द महापालिका आयुक्तांनीच परवानगी दिल्याची माहिती मोतीलाल नगर विकास समितीला महापालिकेने दिली आहे.शास्त्रीनगर परिसरात द्वारका हाउसिंग सोसायटी बांधणाऱ्या बिल्डरने शास्त्रीनगर आणि मोतीलाल नगर क्रमांक १ या दोन वसाहतींमधील मुख्य नाल्यावर ६८ फ्लॅटधारकांसाठी बेकायदा पार्किंग उभारले आहे. खुल्या नाल्यावर अतिशय कमी उंचीवर लोखंडी गर्डर टाकून त्यावर सिमेंट-काँक्रिटचा स्लॅब टाकण्यात आला आहे. त्यामुळे नाल्यातील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.२६ जुलै २००५ रोजी झालेल्या महाप्रलयावेळी याच नाल्यातील पाण्याने मोतीलाल नगरातील नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. तर गोरेगाव परिसरातील १० जणांना आपले प्राणही गमवावे लागले होते. महाप्रलयानंतर नेमलेल्या चितळे समितीने आपल्या अहवालात या नाल्याची उंची १.९ मीटर करण्याचे सुचवले होते. परंतु तसे न करता महापालिका आयुक्तांनी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करत नाल्याची १.७ मीटर उंची ठेवून त्यावर पार्किंग बांधण्यास मंजुरी दिली आहे. यानंतरही नाल्याची उंची १.२ मीटर ठेवून बांधकाम केल्याने पावसाळ्यात येथे पाणी तुंबून रहिवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.पालिका आयुक्त अजय मेहता यांनी बांधकाम आहे त्या स्थितीत मंजूर करण्यास परवानगी दिल्याची माहिती महापालिकेने माहिती अधिकाराअंतर्गत दिली आहे. या बांधकामावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मोतीलाल नगर विकास समितीचे उपाध्यक्ष राजन कांबळी यांनी दिला आहे.