Join us  

मिठीबाई बस स्थानकासमोर बेकायदा पार्किंग; चालकांना करावा लागतो वाहतूककोंडीचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 12:59 PM

येथून जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पदपथावर असलेल्या विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी भर रस्त्यात बेकायदा वाहन पार्किंग करण्याचे प्रकार विलेपार्ले येथील मिठीबाई बसस्थानकासमोर सुरू आहेत. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

विलेपार्ले पश्चिम येथील मिठीबाई कॉलेजसमोर पूर्वी आरेचा दूध स्टॉल होता. सध्या येथे कोल्ड कॉफी, मसाला डोसा, सॅण्डविच अशा खाद्यपदार्थांची अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे येथून जाताना काही खासगी वाहनधारक भर रस्त्यात आपली वाहने उभी करून खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसतात. सकाळी आणि संध्याकाळी येथे बेकायदा पार्किंग केलेली अनेक वाहने उभी असतात. येथे जवळच पालिकेचे कूपर रुग्णालय आहे. याच मार्गावर अनेक रुग्णवाहिका ये-जा करत असतात. शिवाय जुहू चौपाटी येथे जाणाऱ्या वाहनांनाही या बेकायदा पार्किंगच्या वाहन कोंडीतून वाहने काढावी लागतात. तसेच समोरच मिठीबाई कॉलेज आहे. कॉलेज सुरु झाल्यावर येथे कोंडी होईल.

कारवाईला घाबरत नाही

-  दरम्यान, याबाबत बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्यांना विचारणा केली असता ते कोणत्याही कारवाईला घाबरत नसल्याची उत्तरे देतात. -  वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या असता ते कधी तरी नावापुरते येतात. -  मात्र, कोणतीही ठोस कारवाई येथील पार्किंगवर तसेच दुकानांवर केली जात नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.-  वाहतूक पोलिसांनी याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :विलेपार्लेवाहतूक कोंडी