बिरवाडी : महाड औद्योगिक वसाहत पोलिसांच्या हद्दीतील नांगलवाडी परिसरात अवैध दारु साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी २ धाडीमध्ये एकूण ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. दारुबंदी खात्याच्या आशिर्वादानेच बिअर शॉपीमध्ये अवैध दारु विक्री सुरु असल्याचे या घटनेवरुन पुन्हा एकदा समोर आले आहे. याबाबत महाड औद्योगिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगलवाडी फाटा येथील बिअर शॉपीच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या गाळ्यामध्ये अवैधरीत्या देशी, विदेशी दारुची विक्री विनापरवाना बेकायदेशीररीत्या चालू असल्याची माहिती महाड औद्योगिक वसाहत पोलिसांना मिळताच त्यांनी प्रभारी अधिकारी अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. डी. सकपाळ, पी. एस.आय. पी. एस. लोंढे, सहाय्यक फौजदार नागे यांच्यासह धाड टाकली . यावेळी दोन व्यक्ती खाली बॉक्स घेऊन बसलेल्या स्थितीत आढळून आल्याने पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे १ हजार ८८१ रुपये किंमतीची अवैध दारु १८० मिलीच्या २९ बाटल्या असा मुद्देमाल आढळून आला. प्रोव्हीबिशन अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपी राजू गरुडे वय २९, तम्मा शंकर येवले वय ३४, रा. नांगलवाडी यांना अटक केली आहे. सदर घटनेची फिर्याद पोलीस शिपाई राजू बबन पवार वय ३२ यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे अवैध दारु साठ्याची दुसरी कारवाई हॉटेल प्रीती पॅलेसलगत सुप्रिम हॉटेलसमोरील दुकान गाळ्याच्या बाजूला असलेल्या गाळ्यातील ठिकाणी ३ हजार २१९ रुपये किंमतीची देशी, विदेशी वेगवेगळ्या कंपनीच्या ७५ क्वार्टर सिलबंद आढळून आल्याने यातील आरोपी राजू सोनू मालुसरे रा. कांबळे तर्फे बिरवाडी याला विनापरवाना बेकायदेशीर देशी दारु स्वत:च्या ताब्यात, कब्जात बाळगून आरोपी महमद सटन शफी अहमद खान वय २७, सध्या रा. नांगलवाडी मूळ रा. उत्तरप्रदेश, अनिल मोहन काळे वय २८ सध्या रा. तांंबट भुवन पोलादपूर मूळ रा. सातारा, प्रशांत बबन काळे वय २१ हे आरोपी दारु पित असताना आढळून आले.
महाडमध्ये अवैध दारुसाठा जप्त
By admin | Updated: May 19, 2014 04:46 IST