मुंबई : बोगस प्रमाणपत्राद्वारे इमारतीच्या बांधकामाला ना हरकत प्रमाणपत्र मिळवणाऱ्या विकासकाची खबर मुंबई विमानतळ प्राधिकरणाने पत्राद्वारे पालिका प्रशासनाला दिली होती़ मात्र दोन महिने उलटल्यानंतरही विकासकावर कारवाई करण्यात आलेली नाही़ यावर संताप व्यक्त करीत लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या विकासकाला काळ्या यादीत टाकण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे़झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत गुंदवली येथील महाकाली दर्शन गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर इमारत उभी राहिली आहे़ मात्र हा परिसर विमानतळाला लागून असल्याने या इमारतीच्या बांधकामासाठी विमानतळ प्राधिकरणाची परवानगी आवश्यक होती़ मात्र समुद्र सपाटीपासून भूखंडाची उंची कमी दाखवून विकासकाने प्रमाणपत्र मिळवले होते़ त्यानुसार प्राधिकरणाने ना हरकत प्रमाणपत्र दिले़मात्र हा बोगस प्रकार उघड झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने ना हरकत प्रमाणपत्र रद्द केले़ याबाबत आयुक्त सीताराम कुंटे यांना सूचित करून संबंधित विकासकावर कारवाईची सूचनाही प्राधिकरणाने दोन महिन्यांपूर्वी केली होती़ परंतु दोन महिन्यांनंतरही अद्याप यावर कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला आहे़ (प्रतिनिधी)
बोगस प्रमाणपत्रावर बेकायदा मजले
By admin | Updated: December 27, 2014 01:04 IST