Join us

आयआयएम मुंबईचा होणार कायापालट, ८०० कोटी खर्चून अत्याधुनिक सोयीसुविधांची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 07:53 IST

IIM Mumbai : तब्बल ८०० कोटी रुपये खर्चून आयआयएम मुंबईचा कायापालट केला जाणार आहे. त्याचे भूमिपूजन द एरॉनॉटिकल सोसायची ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि डीआरडीओ माजी प्रमुख डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी केले आले.

 मुंबई - तब्बल ८०० कोटी रुपये खर्चून आयआयएम मुंबईचा कायापालट केला जाणार आहे. त्याचे भूमिपूजन द एरॉनॉटिकल सोसायची ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि डीआरडीओ माजी प्रमुख डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी केले आले. यावेळी आयआयएम मुंबई संस्थेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष शशी किरण शेट्टी आणि संचालक मनोज तिवारी उपस्थित होते.

६४ एकर परिसराचा पुनर्विकास केला जाणार असून, १००० प्रेक्षक क्षमता असलेले बहुउद्देशीय सभागृह उभारले जाणार आहे. मुलांच्या आणि मुलींच्या वसतिगृहांच्या जागी टोलेगंज इमारती उभारून १२५० विद्यार्थी आणि १२५० विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था केली जाईल. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ३३८ घरे बांधली जाणार आहेत. त्याचबरोबर नवीन लेक्चर संकुल, प्रशासकीय इमारत प्रस्तावित असून, या इमारतींपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल ९७ पायऱ्या आकर्षक पद्धतीने उभारल्या जाणार आहेत. विहार आणि पवई लेकचे सौंदर्य न्याहाळता यावे यासाठी नेचर ट्रेल, तळ्याभोवती फिरण्यासाठी वाटा, प्रशस्त वाचनालय, खेळाची मैदाने उभारण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती ‘आयआयएम’चे संचालक मनोज तिवारी यांनी दिली. 

विद्यार्थी संख्या दुप्पट करणारआयआयएम मुंबईत सध्या १२०० विद्यार्थी शिकत आहेत. पुढील तीन वर्षांत ही संख्या दुप्पट करून २४०० पर्यंत नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच उद्योगविश्वाशी सहकार्य करून काही अभ्यासक्रम नव्याने राबविले जाणार आहेत. त्याचबरोबर येत्या काही वर्षांत बॅचलर ऑफ सायन्स (बीए) डेटा सायन्स, इकोनॉमिक्स सायन्स, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स आदी अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे, असेही यावेळी तिवारी यांनी नमूद केले. 

निधीसाठी विविध संस्थांची मदतआयआयएम मुंबईचे काम तीन टप्प्यांमध्ये केले जाणार असून, त्यासाठी ८०० कोटींचा खर्च येईल. यातील ९५ कोटी रुपयांच्या कामाची यापूर्वीच सुरुवात झाली असून, त्यातून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारले जात आहे. आयआयएम मुंबईकडे सुमारे १०० कोटींचा निधी शिल्लक आहे. तसेच हायर एज्युकेशन फायनान्सिंग एजन्सीकडून २०० कोटी उभारण्यात येईल. तसेच केंद्र सरकारच्या व्हायेबली गॅप फंडिंगच्या माध्यमातून ३०० कोटी रुपयांच्या निधी मिळविला जाणार आहे. संस्थेचे माजी विद्यार्थी, मुंबईतील विविध कंपन्यांचा सीएसआर फंड आदींमार्फत काही रक्कम उभारली जाणार आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली. 

टॅग्स :मुंबईशिक्षण क्षेत्र