Join us  

आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष , ‘अर्थ’पूर्ण कामगिरीत पोलीस अधिकारी मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 4:08 AM

बदली झालेल्या अधिकारी, अंमलदारांना तत्काळ कार्यमुक्त करण्याच्या मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिलेल्या आदेशाकडे, बहुतांश प्रभारी अधिकारी व वरिष्ठ निरीक्षकांनी कानाडोळा केल्याची

मुंबई : बदली झालेल्या अधिकारी, अंमलदारांना तत्काळ कार्यमुक्त करण्याच्या मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिलेल्या आदेशाकडे, बहुतांश प्रभारी अधिकारी व वरिष्ठ निरीक्षकांनी कानाडोळा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बदलीच्या आदेशाला ८-१० दिवस नव्हे, तर तब्बल २-३ महिने उलटूनही काहींनी संबंधितांना नव्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त केलेले नाही. त्यामागे ‘अर्थ’पूर्ण कारणे असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आता सुरू झाली आहे.वारंवार सूचना देऊनही संबंधितांना कार्यमुक्त करण्यात येत नसल्याने, आयुक्त पडसलगीकर यांनी मंगळवारी सर्व अधिकाºयांना अखेरचा निर्वाणीचा इशारा दिला. कार्यवाहीबाबत गुरुवारी (दि.९)अहवाल पाठविण्याची सूचना केली आहे. मुंबईत सुुमारे दीडशेवर अधिकारी, तर हजारावर अंमलदार बदली होऊनही अद्याप पूर्वीच्या ठिकाणी कार्यरत आहेत. यापैकी बहुतांश जण मोक्याच्या ठिकाणी पोस्टिंगवर असून, वरिष्ठांची ‘मर्जी’ सांभाळली जात आहे. त्यांची मुदत कधीच उलटून गेलेली आहे. तरीही त्यातील काही अधिकारी, अंमलदार अपर आयुक्त, उपायुक्त, तर काही जण सहायक आयुक्त व वरिष्ठ निरीक्षकांचा सर्व ‘व्यवहार’ सांभाळत आहेत. त्यामुळे प्रभारी अधिकाºयांना आयुक्तांच्या आदेशाचे पालन करण्याचा विसर पडलेला आहे. या प्रकरणी मंगळवारी आयुक्तांच्या नावे सर्व विभाग व पोलीस ठाण्यांना विशेष वायरलेस मेसेज पाठविण्यात आला आहे. बदली झालेल्यांना कोणतीही सबब न सांगता, तातडीने कार्यमुक्त करा आणि त्याचा अहवाल ९ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याची सूचना केली आहे.काही अधिकारी, अंमलदारांनी वैद्यकीय, कौटुंबिक कारणास्तव आयुक्तांची प्रत्यक्ष भेट (ओआर) घेऊन विनंतीवर बदली करून घेतली आहे. मात्र, प्रभारी अधिकाºयांनी अद्यापही त्यांना कार्यमुक्त केलेले नाही. अतिकामच्या ताणामुळे मानसिक स्वास्थ बिघडून काहींनी वैतागून ‘सिंक’ रिपोर्ट केला आहे. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे विक्रोळीतील सहायक निरीक्षक खरे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला, याकडे लक्ष द्यायला हवे, आणखी बळी हवेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

टॅग्स :पोलिस