Join us

गड-किल्ल्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्षच - छत्रपती संभाजीराजे

By admin | Updated: June 6, 2015 22:26 IST

राजस्थानसह देशातील अनेक राज्यांतील गडकिल्ले आणि पुरातन वास्तूंच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार कोट्यवधींचा निधी देते.

रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा; शिवघोषांनी रायगड दुमदुमला

संदीप जाधव, महाड -  राजस्थानसह देशातील अनेक राज्यांतील गडकिल्ले आणि पुरातन वास्तूंच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार कोट्यवधींचा निधी देते. मात्र ज्या राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्या छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यासह महाराष्ट्रातील अन्य गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार दुजाभाव का करते, असा सवाल करीत पुढील राज्याभिषेक दिन सोहळ्यापर्यंत रायगडच्या विकासनिधीसाठी शासनाने कठोर पावले उचलली नाहीत तर आपण स्वत: यासाठी खर्चाची जबाबदारी पेलण्यास तयार आहोत, असे प्रतिपादन युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. किल्ले रायगडावर ३४२ वा शिवराज्याभिषेक दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सोहळ्यासाठी संपूर्ण राज्यभरातून पाऊण लाखाहून अधिक शिवभक्तांनी हजेरी लावली. छत्रपती संभाजीराजे भाषणात म्हणाले, अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार बरोबर घेवून ज्या राजांनी स्वराज्य उभे केले त्या छत्रपती शिवरायांचा जगभरात कुठेही पुतळा नव्हता. मात्र राजर्षी शाहू महाराजांनी शिवरायांचा पहिला पुतळा पुण्यात उभारला. ब्रिटनच्या युवराजांनाही या शिवपुतळ्यासमोर नतमस्तक व्हावे लागले होते. ज्या ठिकाणी रायगडावर शिवराज्याभिषेक झाला त्या ठिकाणी असलेल्या मेघडंबरीतील शिवरायांचा पुतळा नसल्याची खंत असंख्य शिवभक्तांना सतत सलत होती. २००९ मध्ये आपण स्वत: या मेघडंबरीतील पुरातत्व विभागाचा विरोध असतानाही सिंहासनाधिष्ठित शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली. शिवरायांचा हा पुतळा मेघडंबरीतून काढावा अशा प्रकारचे पत्र दोनच दिवसांपूर्वी आल्याचा हवाला देत हिंमत असेल तर पुतळा काढून दाखवावाच, असा इशाराही संभाजीराजे यांनी यावेळी दिला. संभाजीराजे म्हणाले, वर्ल्ड हेरिटेज साईडमध्ये राजस्थानच्या सात किल्ल्यांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील एकाही गड-किल्ल्यांचा समावेश नाही. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. औरंगाबादेतील औरंगजेबाच्या पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेला बिबीका मकबरा, आग्य्रातील हुमायुनची कबर, या वास्तूसाठी पुरातत्व विभाग दरवर्षी करोडो रुपये खर्च करते, मात्र महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांसाठी निधी देण्यात सरकार हात आखडता घेत असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. सरकारमध्ये महाराष्ट्रातील गड-किल्ल्याच्या संवर्धनाबाबत अभाव आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षातून एकतरी कॅबिनेट मिटिंग रायगड किल्ल्यावर आयोजित करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार माणिक जगताप यांनी रायगडावर सुरू केलेल्या या लोकोत्सवाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे.