Join us
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण सोसायट्यांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: December 21, 2014 00:54 IST

शहरातील टोलेजंग इमारतीमध्ये राहणारे नागरिकही इमारतीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

नामदेव मोरे - नवी मुंबईशहरातील टोलेजंग इमारतीमध्ये राहणारे नागरिकही इमारतीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षकच नाहीत. बहुतांश ठिकाणी कमी वेतनात राबणारे परप्रांतीयांना सुरक्षा रक्षकाची नोकरी देण्यात आली असून त्यांच्याकडून सुरक्षेऐवजी इतर कामे करून घेतली जात आहेत. त्यामुळे या सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.वाशी सेक्टर १४ मधील सद्गुरू सोसायटीमध्ये राहणाऱ्या तनुजा अगरवाल यांच्या घरामध्ये १३ ते १६ डिसेंबर दरम्यान चोरी झाली. चोरट्यांनी चौथ्या मजल्यावरील घराचा दरवाजाचे कुलुप तोडून आतमधील ३० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व एक किलो चांदी चोरून नेली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक नसल्याचे निदर्शनास आले आहे. शुक्रवारी रात्री खारघरमधील वास्तूविहार सोसायटीत राहणाऱ्या बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा मिनाक्षी जयस्वाल यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणी भेट दिली असता तेथे सुरखा रक्षक जागेवर नसल्याचे निदर्शनास आले होते. शहरातील इतर इमारती व टॉवरमध्येही सुरक्षेची अशीच स्थिती आहे. अनेक सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. ज्या इमारतींमध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केलेली आहे त्यामध्ये मान्यताप्राप्त एजन्सीच्या रक्षकांचे प्रमाण अत्यंत तुरळक आहे. बोगस एजन्सीमार्फत परप्रांतीयांना सुरक्षा रक्षकांची नोकरी दिली जात आहे. सुरक्षा रक्षकांचे नाव पत्ता, चारित्र्य पडताळणी या कशाचाही विचार केला जात नाही. गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी कमी वेतनावर सुरक्षा रक्षक नेमण्यास प्राधान्य देत आहेत. काही ठिकाणी एकच सुरक्षा रक्षक चोवीस तास काम करतो. काही सुरक्षा रक्षक दिवसा १२ तास एक ठिकाणी व रात्री १२ तास एक ठिकाणी अशी चोवीस तास काम करतात. कमी पैशामध्ये नोकरी करावी लागत असल्यामुळे हे पर्याय निवडले जात आहेत. सुरक्षा रक्षकांना साप्ताहीक सुट्टीही दिली जात नाही. यामुळे सुरक्षा रक्षक असूनही चोरीच्या घटना थांबत नाहीत. पोलिस आयुक्त, उपआयुक्त यांनी गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या अनेक वेळा मिटींग घेतल्या आहेत. पत्र पाठवूनही सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सुचना केल्या आहेत. खारघरमध्ये बोगस सुरक्षा रक्षक एजन्सी चालविणाऱ्यांवर गुन्हेही दाखल केले होते. परंतु त्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाहीत.च्गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकाला कमी वेतन दिले जाते. त्याला इमारतीमधील वाहने धुण्याचे काम दिले जाते व त्यामधून पैसे कमविण्यास सांगण्यात येते. च्इमारतीमध्ये पाणी सोडणे व पाणी बंद करण्याचे कामही सुरक्षा रक्षकच करत असतात. याशिवाय काही ठिकाणी इमारतीमधील रहिवाशांना भाजीपासून इतर वस्तू दुकानातून आणून देण्याचे कामही त्यांनाच सांगितले जात असल्यामुळे सुरक्षा रक्षक फक्त नावालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहरात अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकच चोऱ्या करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुरक्षा रक्षक नेमताना त्याचे नाव, पत्ता, चारित्र्य पडताळणी केली जात नाही. अधिकृत एजन्सीकडून सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली जात नसल्यामुळे अशाप्रकारच्या घटना होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांनी पैसे वाचविण्यासाठी बोगस एजन्सीकडून सुरक्षा रक्षक घेवू नये अशा सुचनाही पोलिसांनी केल्या आहेत.